चाहते त्यांच्या आवडत्या वेब सीरिजच्या सिक्वेल्स आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरिजचे पहिले भाग खूप गाजले होते. आता या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. चला जाणून घेऊया कधी होणार रिलीज या सीरिज…
आश्रम ४: बॉबी देओलची वेब सीरिज 'आश्रम ४' यावर्षी रिलीज होऊ शकते. या सीरिजची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण, भोपा स्वामीची भूमिका साकारणारे चंदन रॉय सन्याल यांनी मार्च २०२४ मध्ये बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, या वर्षी चौथ्या सीझनचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
दिल्ली क्राईम ३: 'दिल्ली क्राईम ३' यावर्षी रिलीज होऊ शकतो. शेफाली शाहने ऑक्टोबर २०२३मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'आम्ही अद्याप सीरिजचे शूटिंग सुरू केलेले नाही. सीरिज अद्याप स्क्रिप्टिंग टप्प्यात आहे. आम्ही पुढच्या वर्षी शूटिंग सुरू करू, आणि मला वाटतं पुढच्या वर्षाच्या अखेरीस ती प्रदर्शित होईल. मात्र, आम्ही शूटिंग कधी सुरू करतो आणि ते पूर्ण करतो. यावर रिलीजची तारीख अवलंबून असेल.’
कोहरा २: मंगळवारी (२७ ऑगस्ट) नेटफ्लिक्सने 'कोहरा'च्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली. नेटफ्लिक्सने सांगितले होते की, यावेळी मोना सिंह देखील बरुण सोबतीसोबत मुख्य भूमिकेत असेल. नेटफ्लिक्सने या सीरिजची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. पण, या वर्षाच्या अखेरीस ही सीरिज रिलीज होऊ शकते, असे बोलले जात आहे.
फर्जी २: ‘फर्जी' अभिनेत्री राशी खन्ना हिने सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना सांगितले होते की, ‘मी राज सरांशी बोलले, जे आमचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी मला सांगितले की 'फर्जी २'चे शूटिंग पुढच्या वर्षी लवकर सुरू होईल. त्यामुळे शक्यतो ‘फर्जी २’ या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होऊ शकते.’
काला पानी २: नेटफ्लिक्सने २०२३मध्ये 'काला पानी'चा दुसरा सीझन जाहीर केला होता. अशा स्थितीत त्याचा दुसरा सीझन यावर्षी रिलीज होणार असल्याचे मानले जात आहे.