
मालिका विश्वात आज प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. एकाच दिवशी एक-दोन नव्हे, तर तब्बल ४ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या निमित्ताने छोट्या पडद्यावर चुरस पाहायला मिळणार आहे. आता प्रेक्षकांचा कौल कोणत्या मालिकेला मिळतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
साधी माणसं: एकाच गावात रहात असलेल्या दोन टोकाचे स्वभाव असणाऱ्या व्यक्ती पाहायला मिळणार आहेत. मीरा स्वभावाने अतिशय सकारात्मक, सहनशील आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी मुलगी आहे. तर, घरची परिस्थिती बेताची असली, तरी हेही दिवस सरतील, असा आत्मविश्वास तिने नेहमीच बाळगला आहे. मात्र, सत्या आणि नशिबाचा ३६चा आकडा आहे. डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं, पण आता तो गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करत आहे. स्वत:च्या धुंदीत रहाणारा सत्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. अशा या दोन विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यासोबत नियती आता कोणता खेळ खेळणार, याचीच गोष्ट ‘साधी माणसं’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘साधी माणसं’ ही मालिका आजपासून (१८ मार्च) संध्याकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
घरोघरी मातीच्या चुली: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र, घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे... याच आपल्या माणसांची गोष्ट ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आजपासून (१८ मार्च) संध्याकाळी ७.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
पुन्हा कर्तव्य आहे: 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत अभिनेता अक्षय म्हात्रे हा ‘आकाश’ची भूमिका साकारत आहे. आकाश हा दोन गोड मुलींचा बाबा आहे. तर, अभिनेत्री अक्षया हिंदळकर ‘वसुंधरा’ बनून त्याची साथ देणार आहे. वसुंधरा ही एका मुलाची आई आहे. आता ही दोन कुटुंब एकत्र येऊन, कसं आपलं एक सुखी कुटुंब तयार करणार, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका आजपासून (१८ मार्च) रात्री ९.३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
नवरी मिळे हिटलरला: 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेमध्ये अभिराम जहागीरदार हा ‘मिस्टर परफेक्टशनिस्ट’ आहे. अभिरामचं व्यक्तिमत्व अतिशय डॅशिंग आहे. तो अतिशय शिस्तबद्ध आणि वक्तशीर आहे. ज्यामुळे त्याला ‘हिटलर’ हे टोपणनाव मिळाले आहे. आता अभिरामसाठी नवरी शोधण्याची मोहीम त्याच्या तीन सुनांनी सुरू केली आहे. आता त्यांच्या आयुष्यात लीलाची एन्ट्री होणार आहे. लीला जेव्हा अभिरामला भेटेल तेव्हा काय होणार, हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आजपासून (१८ मार्च) रात्री १० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.



