
बारामतीत ‘काका-पुतण्या’च्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेले आहे. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहेत. युगेंद्र पवार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. प्रचार फेरी, कोपरा सभा, मतदारांच्या थेट भेटीगाठींवर युगेंद्र यांचा भर आहे. आता त्यांना साथ मिळाली आहे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांची. अजित पवार हे रेवती सुळेंचे मामा. तर युगेंद्र पवार हे मामेभाऊ. बारामतीत रेवती या मामांऐवजी मामेभाऊच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार आणि रेवती सुळे यांनी नुकतेच बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमधील नक्षत्र गार्डनमध्ये सकाळी फेरफटका मारत मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत आहेत.
रेवती सुळे या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नात आहे. रेवती यांचे इंग्लंडमध्ये शिक्षण झाले असून त्यांनी नुकतेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर्स डिग्री घेऊन पदवीधर झाल्या आहेत. रेवती पदवीधर झाल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
युगेंद्र पवार हे सध्या बारामतीत छोटे व्यापारी, फळ विक्रेते, चहा विक्रेत्यांच्या भेटीगाठीवर भर देत आहेत. बारामती शहरातील राजू बागवान यांच्या फ्रुट स्टॉलला युगेंद्र आणि रेवती यांनी नुकतीच भेट दिली. तसेच त्यांच्याशी गप्पा मारल्या. याप्रसंगी त्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रेवती सुळे यांनी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात फिरून प्रचार केला होता. विधानसभा निवडणुकीत त्या युगेंद्र पवार यांच्यासाठी प्रचार रॅली काढून मतदारांना भेटत आहेत. बारामती मतदारसंघात खासकरून महिला आणि तरुणींना भेटून रेवती या युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना दिसतात.



