
आयपीएल 2023 च्या ६७व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा ७७ धावांनी पराभव केला. या विजयासह सीएसकेने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. सीएसके पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायनटन्सला २३ मेला भिडेल.
नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली-चेन्नई सामना झाला. दिल्लीच्या होमग्राउंडवर बहुतांश चाहते सीएसकेच्या जर्सीमध्ये दिसले. यामागचे कारण होते एमएस धोनी, ज्याचे चाहते त्याची फलंदाजी आणि कॅप्टन्सी पाहण्यासाठी दूरदूरवरून आले होते.
या सामन्यापूर्वी राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर एक अद्भूत दृश्य पाहायला मिळाले. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसले. यावेळी चाहत्यांनी CSK च्या बसला घेराव घातला होता. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. याबाबत सीएसकेच्या वतीने एक पोस्टही करण्यात आली होती.
एमएस धोनीचा हा शेवटचा आयपीएल सीझन असू शकतो, असे बोलले जात आहे, त्यामुळे धोनीची टीम जिथे खेळत आहे. तिथे चाहते पिवळी जर्सी घालून मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचल्यामुळे धोनीचा संघ चेपॉकवर पहिला क्वालिफायर सामना खेळेल. हा सामना २३ मेला गुजरातविरुद्ध होणार आहे.
दिल्ली-चेन्नई सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने ३ गडी गमावून २२३ धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉनवेने ५२ चेंडूत ८७ धावा केल्या, ज्यात ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ५० चेंडूंत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ७९ धावांची खेळी केली.
कॉनवे आणि गायकवाड यांनी मिळून १४१ धावांची सलामी दिली. दिल्लीकडून खलील अहमद, चेतन साकारिया आणि एनरिक नोर्किया यांनी १-१ बळी घेतला. २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात १४६ धावाच करू शकला.
दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५८ चेंडूत ८६ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने ५ षटकार आणि ७ चौकार मारले. वॉर्नरशिवाय दिल्लीचा एकही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. सीएसकेकडून दीपक चहरने सर्वाधिक तीन बळी घेतले.





