
मोरोक्कोचे यश हे त्यांच्या खेळाडूंच्या अहोरात्र मेहनतीचे फळ आहे. जवळपास ३.६७ कोटी लोकसंख्येचा हा छोटासा आफ्रिकन देश उपांत्य फेरी गाठेल असे क्वचितच कोणाला वाटले असेल. कारण या विश्वचषकापूर्वी मोरोक्कोला क्वार्टर फायनलमध्येही कधी पोहोचता आले नव्हते.
मोरोक्कोचे बरेच लोक फ्रान्स, स्पेन, नेदरलँड यांसारख्या देशांमध्ये स्थायिक आहेत. पण जेव्हा देशासाठी खेळण्याचा प्रसंग येतो तेव्हा कोणीही मागे हटत नाही.
मोरोक्कोचे बरेच लोक फ्रान्स, स्पेन, नेदरलँड यांसारख्या देशांमध्ये स्थायिक आहेत. पण जेव्हा देशासाठी खेळण्याचा प्रसंग येतो तेव्हा कोणीही मागे हटत नाही.
हकीम झियेच, सोफियान बौफल, रोमेन सैस, अश्रफ हकीमी आणि यासिन बोनो हे सध्याच्या संघातील स्टार खेळाडू एकतर परदेशात जन्मलेले आहेत किंवा सध्या परदेशी लीगमध्ये खेळतात. फिफा वर्ल्डकपसाठी हे सर्वजण एकत्र आले. त्यापूर्वी या संघाची कामगिरी तितकी चांगली नव्हती.
मात्र, आता मोरोक्कोच्या संघात बरीच सुधारणा झाली आहे. याचे सर्वात मोठे श्रेय हे संघाचे कोच वालिद रेग्रागुई यांचे आहे. रेग्रागुई यांनी काही महिन्यांतच संघाचे नशीब पालटले आहे. वालिद रेग्रागुई यांची या वर्षीच ऑगस्टमध्ये संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
सोबतच, मोरोक्कोच किंग मोहम्मद सहावे यांनीही मोरोक्कन फुटबॉलच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. किंग मोहम्मद यांनी या देशात फुटबॉल अकादमीच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केली. याचा परिणाम म्हणून, असे खेळाडू उदयास आले आहेत. जे परदेशी लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहेत.
तसेच. मोरोक्को फुटबॉल संघाच्या यशामागे त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. मोरोक्कोने पोर्तुगालविरुद्ध सामना जिंकल्यानंतर टीमचा मिडफिल्डर सोफियान बौफल त्याच्या आईसोबत डान्स करताना दिसला.
मोरोक्कोला पाठिंबा देण्यासाठी हजारो चाहते कतारमध्ये पोहोचले आहेत. या वर्ल्डकपमध्ये मोरोक्कोला आतापर्यंत चाहत्यांचा भरपूर पाठिंबा मिळाला आहे.
मोरोक्कोचा संघ या फिफा वर्ल्डकपमध्ये एकही सामना हरलेला नाही. मोरोक्कोने ५ सामन्यात ४ विजय मिळवले आहेत तर सामना १ अनिर्णित राहिला आहे. विशेष म्हणजे ४ विजयांपैकी ३ विजय हे बेल्जियम, स्पेन आणि पोर्तुगालविरूद्धचे आहेत.
मोरोक्कोचा आतापर्यंतचा प्रवास:
ग्रुप मॅच विरूद्ध क्रोएशिया- ०-० असा बरोबरीत सुटला
ग्रुप मॅच विरुद्ध बेल्जियम २-० विजय
ग्रुप मॅच विरुद्ध कॅनडा २-१ असा विजय
राऊंड ऑफ १६ फेरी विरुद्ध स्पेन ३-० विजय ( पेनल्टी शूटआउट)
क्वार्टर फायनल विरुद्ध पोर्तुगाल १-० असा विजय






