गायक-संगीतकार मोहम्मद रफी हे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात ओळखले जाणारे नाव आहे. त्यांना परिचयाची गरज नाही. त्यांचे 'गुलाबी आखें' हे गाणे तर वेगवेगळ्या पिढ्यांतील लोक गुणगुणू लागतात. त्यांचे चाहते विशिष्ट वयोगटपुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या आयुष्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचित तुम्ही ऐकल्या देखील नसतील.
यापैकी एक अफवा अशी आहे की, या दिग्गज गायकाने २६ हजार गाण्यांना आवाज दिला आहे. परंतु, संगीत संशोधकांना आतापर्यंत फक्त केवळ ७,४०५ गाणी शोधता आली आहेत. मात्र, प्रत्यक्षात यामागे एक वेगळी कथा आहे. त्यांनी २६०००हून अधिक गाणी गायली आहेत, हे तथ्य चुकीचे आहे. परदेशातील एका मैफिलीदरम्यान, रफी यांची ओळख करून देताना, होस्टने जाहीर केले होते की, त्यांनी सव्वीस हजार गाणी गायली आहेत. रफी यांची प्रतिभा आणि गायन कौशल्य लक्षात घेता, सर्वांनी त्यावर विश्वास ठेवला आणि कोणीही या विधानाची सत्यता तपासली नाही.
गायनासोबतच मोहम्मद रफी यांनी ‘लैला मजनू’ आणि ‘जुगनू’ या चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले. दोन्ही चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले.
मोहम्मद रफी यांनी आपला पहिला सार्वजनिक परफॉर्मन्स वयाच्या १३व्या वर्षी दिला. त्यांनी दिग्गज केएल सैगल यांच्या मैफिलीत गाणे गायले होते.
रफी हे परोपकारी आणि दयाळू मनाचे व्यक्ती होते. ते त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका विधवा महिलेला मनीऑर्डरद्वारे पैसे पाठवायचे. हे त्या महिलेला माहित देखील नव्हते. रफी यांच्या मृत्यूनंतर खात्यात पैसे येणे बंद झाले आणि त्यानंतर ती महिला पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करायला गेली. तेव्हाच तिला त्या मनीऑर्डर मागचा खरा चेहरा कळला.
एकदा मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांनी नकळत एकमेकांना आव्हान दिले. आरडी बर्मन यांनी या आव्हानात उडी घेतली. १९६९मध्ये आलेल्या ‘प्यार का मौसम’ या चित्रपटासाठी त्यांनी दोघांनाही ‘तुम बिन जाने कहाँ’ हे मधुर गाणे म्हणायला लावले.
या गाण्यासाठी दोन वेगवेगळ्या गायकांच्या आवाजाची गरज होती. कारण चित्रपटातील दोन भिन्न पात्रे वेगवेगळ्या परिस्थितीत गाताना दाखवायची होती. यावेळी शशी कपूरच्या व्यक्तिरेखेसाठी रफी यांचा आवाज, तर भारत भूषण यांच्या व्यक्तिरेखेसाठी किशोर कुमार यांचा आवाज वापरण्यात आला होता. मात्र, रफी यांच्या आवाजाला अधिक लोकप्रियता मिळाली.