राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा पोरकटपणा असल्याचं म्हटलं होतं. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना राज ठाकरे भाजपचा भोंगा असल्याचं म्हणाले होते. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यापासून सुरु झालेला हा भोंग्याचा विषय आता सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.
(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत भूमिका मांडली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे."
(फोटो - दीपक साळवी)राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर त्यांच्यावर टीकाही झाली. दरम्यान, घाटकोपरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भोंगे लावले तर पुण्यात वसंत मोरे यांनी भोंगे लावणार नाही अशी भूमिका मांडली. त्यांच्यानंतर पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले. त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)ठाण्यात राज ठाकरे यांनी १२ एप्रिल रोजी उत्तर सभा घेतली. यामध्ये त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिलं. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षासह नेत्यांवर जातीयवादाचा आरोप केला. त्यानंतर ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत राज्य सरकारला इशारासुद्धा राज ठाकरे यांनी दिला.
(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)उत्तर सभेनंतर राज ठाकरे यांनी पुण्यात 16 एप्रिलला हनुमान जंयतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं. तसंच महाआरतीसुद्धा कऱण्यात आली. यानंतर राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याची आणि ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली.
(HT_PRINT)खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावतीत मंदिरावर लावण्यासाठी भोंग्याचे वाटप केल्यानं संघर्ष सुरु झाला होता. त्यानंतर त्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणणार असं सांगत थेट मुंबई गाठली. यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
(फोटो - पीटीआय)राणा दाम्पत्यानं दोन दिवसांनी आपण मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार नसल्याचं जाहीर केलं. मात्र त्यानंतर दोन धर्मात द्वेष, तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
(फोटो - एएनआय)एका बाजुला राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांच्या वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. मोहित कंबोज यांच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या वाहनावर हल्ला केला गेला. यात ते जखमी झाले.
(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)किरीट सोमय्या यांनी वाहनावर हल्ला झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांवर गंभीर आरोप करत आपल्या नावाने खोटी एफआयआर दाखल केल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळासह याबाबत केंद्रीय गृहसचिवांना माहिती दिली आहे.
(फोटो - राहुल सिंह)भोंग्यांबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावर भाजपकडून बहिष्कार टाकण्यात आला. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितलं की, "सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत भोंगे बंद करता येणार नाहीत. प्रत्येक नागरिकासाठी कायदा समान आहे. सर्वांना एकच भूमिका घ्यावी लागेल. कायद्याचे उल्लंघन झाल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागेल."
(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)