नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयानंतर महाराष्ट्रासह देशभरातच काँग्रेसची सातत्यानं पीछेहाट होत गेली. मोदींच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात क्वचितच काँग्रेसला विजय साजरे करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र काँग्रेसही त्यास अपवाद नव्हती. मात्र, जल्लोषाची ही प्रतीक्षा नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीनं संपवली आहे.
राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होती. काही उमेदवार अपक्ष असले तरी ते मविआ किंवा भाजप पुरस्कृत होते. महाविकास आघाडीतून अमरावती व नागपूर या दोन जागा काँग्रेसनं लढल्या होत्या. या दोन्ही जागा काँग्रेसनं खेचून आणल्या. विद्यमान आमदारांना पराभूत करून काँग्रेसनं हे यश मिळवलं. त्यामुळं या विजयाचा आनंद काही औरच होता.
मुंबईतील काँग्रेसचं मुख्यालय असलेल्या टिळक भवन इथं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. माजी खासदार हुसेन दलावाई यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नाना पटोले यांना कार्यकर्त्यांनी पेढे भरवून त्यांचं अभिनंदन केलं. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आलं होतं. अनेकांनी ताशाच्या तालावर ठेका धरला. काँग्रेस झिंदाबाद… राहुल गांधी आगे बढो… अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 'विदर्भातील जनता नेहमीच काँग्रेस विचाराची राहिली आहे. विदर्भाप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विधान परिषद निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती करेल. भाजपनं या निवडणुकीत सर्व काही ठरवून केलं, सत्तेचा दुरुपयोग केला. जो जिंकला तो आपला अशी भाजपाची भूमिका आहे. पण या निकालानं ‘प्रजा कोण आणि राजा कोण?’ याचं उत्तर दिलं आहे, असं पटोले म्हणाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही या निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे, असा दावाही त्यांनी केला.