बौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्व - बौद्ध धर्मात पौर्णिमेला विशेष असे धार्मिक महत्त्व आहे. भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यात सर्व महत्त्वाच्या घटना या पौर्णिमेच्या दिवशीच घडल्या आहेत. बुद्धांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती, धर्मचक्रप्रवर्तन आणि त्यांचे महापरिनिर्वाण अशा सर्व घटना पौर्णिमेच्याच दिवशी घडलेल्या आहेत,
नालागिरी हत्तीवर मैत्रीने मिळवला विजय - भगवान बुद्धांचा आतेभाऊ भिक्क्षु देवदत्त हा राजा बिंबिसार याचा पुत्र राजा अजातशत्रू याला हाताशी धरून तथागत बुद्धांना ठार मारण्याची योजन आखू लागला. त्याचाच एक भाग म्हणून देवदत्ताने आजातशत्रूच्या हत्तीशाळेतील नालागिरी नावाच्या हत्तीला मद्य पाजून माहुताला बुद्धांच्या अंगावर सोडण्यास सांगितले. नालागिरी वायुवेगाने बुद्धांच्या अंगावर चाल करून आला. मात्र बुद्धांच्या जवळ येताच त्याचा वेग कमी झाला आणि शांत होत त्याने बुद्धांपुढे गुडघे टेकले. तसेच त्याने आपल्या सोंडेने बुद्धांना अभिवादन केले. बुद्धांनी मैत्री भावनेने नालागिरी हत्तीवर विजय मिळवला. बुद्धाच्या महान प्रतापांपैकी हा एक प्रताप मानला जातो. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा होता.
राजा बिंबिसाराचे दान- मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध राजगृहाला गेले. तेथे राजा बिंबिसार याने आपले वेळूवन बुद्धांच्या भिक्षूसंघाला दान दिले. भगवान बुद्ध राजगृहाला आले आहेत ही वार्ता कळताच त्यांच्या दर्शनासाठी राजा आणि नगरीतील प्रजा तेथे गेली. या दिवशी राजा बिंबिसाराने बुद्धांना भिक्षूसंघासह भाजनाचे आमंत्रण दिले. बुद्धांनी त्या भोजनदानाचे निमंत्रण स्वीकारले. भोजनानंतर बुद्धांनी धर्मोपदेश दिला. त्यानंतर राजाने बुद्धांच्या संघाला वेळूवन दान दिले.
श्रीलंकेत भिक्क्षुणी संघाची स्थापना- मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेत सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा हिच्या हस्ते भिक्षुणी संघाची स्थापना करण्यात आली. अर्हतपदाला पोहोचलेली भिक्क्षुणी संघमित्रा ही सम्राट अशोकाची एकुलती एक मुलगी होती. ती विवाहीत होती. तिला सुमन नावाचा मुलगा होता. सम्राट अशोकाच्या आज्ञेने संघमित्रा श्रीलंकेला रवाना झाली. तेव्हा तिचे वय १९ वर्षांचे होते.
श्रीलंकेच बोधिवृक्षाचे रोपण- मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच भिक्क्षुणी संघमित्रा हिने आपल्या सोबत नेलेली बुद्धगया येथील बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेतील अनुराधपूर या जुन्या राजधानीच्या शहरात लावली. ही अत्यंत महत्त्वाची घटना मार्गशीर्ष पौर्णिमेला घडली.