मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत हिने फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या सिद्धेश चव्हाणबरोबर तिने सात फेरे घेतले. इतकंच नाही तर, अभिनेत्री लग्नानंतर नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. सध्या अभिनेत्री पूजा सावंत ऑस्ट्रेलियामध्येच असून, ती भटकंती करताना दिसत आहे. आता अभिनेत्री मराठमोळ्या अंदाजात ऑस्ट्रेलियामध्ये ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला आहे.
सध्या ऑस्ट्रेलियात राहत असलेली पूजा तिच्या तिथल्या घराचे, तिचे व पती सिद्धेशचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कातदेखील असते. लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवाही तिने ऑस्ट्रेलियातील घरात अगदी मराठमोळ्या पद्धतीने गुढी उभारून साजरा केला होता.
याचे फोटोदेखील तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते. पूजा सावंत सर्व फोटोना चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली होती. अशातच तिने आता ‘महाराष्ट्र दिना’च्या दिवशी देखील एक सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आज १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन. आजचा दिवस अवघ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप खास असून, उत्साहात साजरा केला जात आहे. पूजा सावंत हिने तिच्या ऑस्ट्रेलियातील घरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने सुंदर असे कॅप्शनदेखील दिले आहे.
तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सर्वांना महाराष्ट्रदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. माझी खूप इच्छा होती की मुंबईत असलेल्या घराप्रमाणेच माझ्या ऑस्ट्रेलियाच्या घरात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा असावी. लग्नापूर्वी ही इच्छा मी माझ्या टिमला अगदी सहजपणे बोलून दाखवली होती. त्यातील मनोजने (आमचे स्पॉटदादा) ही प्रतिमा मला आमच्या लग्नात भेट म्हणून दिली. त्यानंतर अगदी काळजीपूर्वक मी महाराजांची ही प्रतिमा ऑस्ट्रेलियाला घेऊन आले. फायनली आता छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ऑसट्रेलियाच्या घरात सुद्धा विराजमान झाले आहेत. खूप खूप धन्यवाद मनोज.