वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. तीळगुळाचा गोडवा सगळ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या या सणाचे सगळ्यांच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व आहे. यातच नववधू म्हणजेच ज्यांची लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे, त्यांच्यासाठी हा सण अतिशय खास असतो. सुगडं पूजन, ते हलव्याचे दागिने, अशा अनेक गोष्टी या सणाच्या निमित्ताने करता येतात. गेल्या वर्षभरात अनेक अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधली आहे, ज्यांची यावर्षी पहिली मकर संक्रांत असणार आहे.
तितिक्षा तावडे : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तितिक्षा तावडे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. तिने लग्नानंतरचे सगळेच सण खास पारंपरिक अंदाजात साजरे केले. यावर्षी ती तिची पहिली संक्रांत साजरी करणार आहे.
वैष्णवी कल्याणकर : 'देव माणूस' फेम जोडी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकार आणि अभिनेता किरण गायकवाड ही जोडी नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. यंदाची मकर संक्रांत त्यांच्यासाठी विशेष खास आहे. कारण ही त्यांची पहिली संक्रांतच नाही तर, लग्नानंतरचा पहिला सण देखील आहे.
पूजा सावंत : आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री पूजा सावंत हिने काही महिन्यांपूर्वीच परदेशात स्थायिक असलेल्या सिद्धेश चव्हाणशी लग्न केले. २८ फेब्रुवारी रोजी हा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. परदेशात राहूनही पूजा आपले सगळे सण पारंपरिक अंदाजात साजरे करत आहे. यंदा तिचीही पहिली मकर संक्रांत असणार आहे.
रेश्मा शिंदे : 'रंग माझा वेगळा' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' अशा मालिका गाजवणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने देखील नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. यंदा ती देखील पहिली मकर संक्रांत साजरी करणार आहे.