अहिल्यानगर येथील बलभिम अण्णा जगताप क्रीडा नगरी येथे महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड हे पैलवान आमनेसामने होते. यात पृथ्वीराज मोहोळ याला २ गुण मिळाले, तर महेंद्र याला १ गुण मिळाला.
पण कुस्ती संपायला १६ सेकंद राहिलेले असताना महेंद्र गायकवाड याने अचानक मैदान सोडले. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी घोषित केले. महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
महेंद्र गायकवाड याने अचानक कुस्ती मैदान सोडल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र काही सेकंदात पृथ्वीराज मोहोळ याला विजय घोषित केल्यानंतर मोहोळ याच्या समर्थकांनी जल्लोष केला.
यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याला मानाची चांदीची गदा आणि 'थार' चारचाकी गाडीची चावी देण्यात आली.