राज्यात उद्या मंगळवारी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत २०४ महिलांसह ४१३६ उमेदवार निवडणुक रिंगणात नशीब आजमवत आहेत. ९ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून १ लाख ४२७ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. त्या पूर्वी मतदानासाठी ईव्हीएम यंत्रे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांपर्यंत मंगळवारी पोहोचवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघात निवडणूक आयोगाने चोख यंत्रणा तैनात ठेवली आहे.
सार्वत्रिक निवडणूकीसाठी बुधवारी (दि २०) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पुणे जिल्ह्यातील विविध मतदार संघात आज सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्याचे वितरण करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक वगळता उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिवशी शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलातील ६०० पोलीस अधिकारी, सहा हजार ८०० पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे एक हजार ७५० जवान बंदोबस्तास तैनात राहणार आहेत. पाेलीस कर्मचाऱ्यांसह संवेदनशील मतदान केंद्रात राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या (सीआरपीएफ) तैनात राहणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.
पुण्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. मतदान प्रकियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
मतदान केंद्राच्या परिसरात व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. राज्य राखीव पोलीस दल, तसेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या संवेदनशील मतदान केंद्राच्या परिसरात तैनात केल्या जाणार आहेत.
पुण्यात पोलिसांनी सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, आतापर्यंत एक हजार ७०० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेची पथके मतदानाच्या दिवशी गस्त घालणार आहेत. अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची पथके शहरातील वेगवेगळ्या भागांत गस्त घालणार आहेत.
पुणे जिल्ह्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. पुणे जिल्ह्यात दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नऊ उपविभागीय अधिकारी, ३५ पोलीस निरीक्षक, २८७ उपनिरीक्षक, तीन हजार २४६ पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दोन हजार ६०० जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या ११ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.