भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर हा महापरिनिर्वाणदिन. या दिवशी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमधून त्यांचे लाखो अनुयायी येत असतात. न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्म अशा विविध विषयांचे ज्ञान असलेले प्रकांडपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जाणून घेऊ या…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. ते त्यांच्या पालकांचे १४ आणि शेवटचे अपत्य होते. सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचे ते सुपुत्र होते. बाबासाहेब दोन वर्षांचे असताना त्यांचे वडीन सेवानिवृत्त झाले. तसेच ते जमतेम ६ वर्षांचे असताना त्यांची आई भीमाबाई यांचे निधन झाले. त्यांच्या आत्याने त्यांचे संगोपन केले. नंतर ते मुंबईला रहायला आले.
बाबासाहेबांचे शालेय शिक्षण सातारा येथे सुरू झाले. शालेय जीवनापासूनच त्यांना भारतात अस्पृश्य असणे काय असते याचे धक्कादायक अनुभव येऊ लागले. १९०७ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनंतर त्यांचा विवाह रमाबाई यांच्याषी भायखळ्याच्या बाजारातील एका खुल्या शेडखाली झाला. डॉ. बाबासाहेबांनी मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. सन १९१३ मध्ये ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून १९१५ आणि १९१६ मध्ये एमए आणि पीएचडी या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. तेथे त्याना ग्रेज इन फॉर लॉ येथे प्रवेश मिळाल. तसेच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे डीएससीची तयारी सुरू केली. मात्र, बडोद्याच्या दिवाणांनी त्यांना परत बोलावले. पुढे त्यांनी बॅरिस्टर अँट लॉ आणि डीएससी ही पदवी मिळवली. त्यांनी जर्मनीतील बॉन या विद्यापीठातही काही काळ शिक्षण घेतले.
१९१६ मध्ये त्यांनी 'भारतातील जाती- त्यांची उत्पत्ती आणि विकास' हा शोधनिबंध वाचला. १९१६ मध्ये त्यांनी 'भारताचा राष्ट्रीय लाभांश- एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास' हा प्रबंध लिहिला. त्यावर त्यांना अर्थशास्त्रातील पीएचडी ही पदवी मिळाली. 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती' या नावाने हा प्रबंध आठ वर्षांनंतर प्रकाशित करण्यात आला. भारतात परतल्यानंतर त्यांना अर्थमंत्री बनवावे या उद्देशाने बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना लष्करी सचिव या पदावर नियुक्त केले. मात्र तेथे अस्पृश्यतेच्या कारणामुळे काम करणे आणि राहणे शक्य झाले नाही. म्हणून ते सेवा सोडून मुंबईला निघून आले.
बाबासाहेबांनी मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. परंतु लंडनमधील पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. 'ब्रिटिश इम्पीरियल फायनान्सचे प्रांतीय विकेंद्रीकरण' या प्रबंधावर त्यांना एमएससी ही पदवी मिळाली. १९२३ मध्ये 'प्रॉब्लेम ऑफ रुपी- इट्स ओरिजीन अँड सोल्युशन' हा प्रबंध सादर केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजुर पक्ष (ILP) ची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन या संस्थेची 18 जुलै 1942 रोजी स्थापना केली. 1956 मध्ये, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ची स्थापना केली. तसेच त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा (1924), समता सैनिक दल (1927), स्वतंत्र मजूर पक्ष (द इंडिपेंडंट लेबर पार्टी )(1936), अनुसूचित जाती फेडरेशन (1942), द पीपल्स एज्युकेशन सोसायटी (1945), भारतीय बौद्ध महासभा (1950) अशा संस्था आणि संघटनांची उभारणी केली.
बाबासाहेबांनी अस्पृश्यांवरील अन्याय-अत्याचार दूर करण्यासाठी लढे उभारले. महिला, मजूर आणि कामगारांसाठी त्यांनी लढाया केल्या. १९२७ साली त्यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. तसेच त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. नाशिक येतील काळाराम मंदिर सत्याग्रह केला. हा सत्याग्रह ५ वर्षे चालला.
सन १९२६ मध्ये त्यांची मुंबई विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. पुढे ते मुंबई विधानसभेचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते झाले. १९४२ मध्ये ब्रिटिश भारताच्या मंत्रिमंडळात मजूरमंत्री झाले. त्यांच्याकडे उर्जा खाते, पाटबंधारे खाते, कामगार अशी खाती होती. १९४६ मध्ये ते संविधान सभेचे सदस्य झाले. त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. राज्यघटना निर्मितीत त्यांचे मोठे योगदान असल्याने त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशी ओळख मिळाली. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले. पुढे त्यांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
१९३५ साली त्यांनी नाशिकमधील येवले येथे, 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही', अशी घोषणा केली. पुढे अशोक विजयादशमीदिनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हे ठिकाण दीक्षाभूमी या नावाने प्रसिद्ध आहे.
डॉ. बाबासाहेब आंबडकर यांचा ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाला महापरिनिर्वाण म्हटले जाते. त्यांचे पार्थिव दिल्लीतून विमानाने मुंबईत आणले गेले. मुंबईतील दादर चौपाटी येथील चैत्यभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर ७ डिसेंबर १९५६ रोजी बौद्ध धम्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. तसेच हे ठिकाण महापरिनिर्वाण स्थळ किंवा चैत्यभूमी या नावाने ओळखले जाते.