राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना बाजार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी मुंबईत 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यावर्षी हे प्रदर्शन ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात विविध वस्तुंसोबतच मातीपासून तयार करण्यात आलेल्या विविध आकाराच्या शोभेच्या वस्तू, भांडी, जेवण तयार करण्यासाठीची मातीची भांडी, लाल व काळ्या रंगाची मातीची भांडी मांडण्यात आलेली आहे. ग्रामीण कला व संस्कृती अनुभवण्यासाठी 'महालक्ष्मी सरस' ला आवर्जून भेट देण्याचे असे आवाहन राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.
ग्रामीण महिलांनी मोठ्या कौशल्याने तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, रंगीबेरंगी वस्त्रे, गळ्यातील हार व इतर दर्जेदार उत्पादने येथे प्रदर्शन व विक्रीसाठी मांडण्यात आलेली आहे.
महालक्ष्मी सरस प्रदर्शनात पंचधातूच्या सुबक, आकर्षक कोरिव मूर्ती तसेच दगडी खलबत्ते, दगडी जाते आणि वरवंटे विक्रीस ठेवले आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कलावंतांनी तयार केलेल्या या वस्तू एकाच छत्राखाली ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मातीच्या भांड्यांचा शोध हा सर्वात प्राचीन मानवी शोधांपैकी एक मानला जातो. मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यसाठी फायदेशीर मानले जाते. विविध प्रकारची आणि आकाराची मातीची भांडी हे महालक्ष्मी-सरस प्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य आहे.
महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भरपूर संख्येने असलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. महाराष्ट्राच्या विविध भागातल्या खाद्यसंस्कृतीचं इथं दर्शन होतं. विदर्भातील झणझणीत पदार्थांपासून कोकणातील विविध प्रकारचे माशांचे पदार्थ येथे खाण्यासाठी उपलब्ध असतात. शिवाय विविध प्रकारच्या चटण्या, मसाले विक्रीसाठी उपलब्ध असतात.