महादेव बेटिंग अॅपचा प्रचार केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन ही मोठी कारवाई केली आहे. सध्या साहिल खानची कसून चौकशी सुरु असून या प्रकरणात काही माहिती समोर येते का हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. आता अटक झालेला हा अभिनेता आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
बॉलिवूडमधील देखण्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये साहिल खानचे नाव घेतले जाते. चांगला लूक, चांगली बॉडी, उत्तम अभिनय अशी साहिल खानची ओळख होती. मात्र, त्याने काम केलेला प्रत्येक चित्रपट हा फ्लॉप ठरला होता. साहिल खानने २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टाइल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात साहिलसोबत अभिनेता शरमन जोशी मुख्य भूमिकेत होता. त्यावेळी साहिल आणि शरमनची जोडी हिट ठरली होती. पण या चित्रपटानंतर साहिल फारसा दिसला नाही.
साहिल खानने २००४ साली अभिनेत्री निगार खानशी लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या एक वर्षातच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफने साहिल गे असल्यामुळे पत्नीने घटस्फोट दिला असल्याचा म्हटले होते. तसेच साहिलने ८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ही त्यांनी केला होता. आयशा यांच्या मते साहिलच्या पत्नीला साहिल गे असल्याचे कळाल्यानंतर तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.
सध्या साहिलने स्वत:ची जीम सुरु केली आहे. संपूर्ण भारतात त्याच्या जीमच्या ब्रांच आहेत. तसेच तो एक यूट्यूब चॅनेल देखील चालवतो. त्यानंतर त्याने मिनरल वॉटरचा देखील बिझनेस केला. काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर साहिलने इंडस्ट्रीला रामराम ठोकत नवे बिझनेस सुरु केले.