‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या आणि लोकप्रिय चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आता काही जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळताना दिसत आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात पहिल्या सीटवर बसून, हातात ब्रश घेऊन बडबड करणारी व्हीजे म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने देखील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात मधुराणी प्रभुलकर हिने छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र, तिची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तिला ही भूमिका कशी मिळाली, याचा किस्सा नुकताच तिने शेअर केला आहे. या भूमिकेबद्दल सांगताना मधुराणी म्हणाली की, ‘मी त्यावेळी मनोरंजन विश्वात नवखी होते.’
मधुराणी पुढे म्हणाली की, ‘त्यावेळी मुंबई शहरात पण मी नवीच होते. एका मालिकेत काम केलं आणि मला हा चित्रपट मिळाला. त्यावेळी मी स्वतः सचिन पिळगावकर यांच्याकडे जाऊन काम मागितलं होतं. माझी आवड बघून त्यांनी मला हे भूमिका देऊ केली होती.’
त्या भूमिकेचं ऑडिशन देताना मधुराणीने तिच्या एका भाचीची नक्कल केली होती. या भूमिकेत ती व्हीजे जसं इंग्रजी बोलायची तसंच इंग्रजी मधुराणीची एक भाची बोलायची. सचिन पिळगावकर यांना हिच स्टाईल आवडली आणि त्यामुळे चित्रपटात हीच स्टाईल वापरली गेली.