अनेकदा घरातील वृद्ध लोकांना पाय दुखीचा त्रास होतो. त्यांना गुडघ्यात वेदना किंवा सूज जाणवते. आता तरुण मुला-मुलींमध्ये सुद्धा ही समस्या दिसून येत आहे. या लक्षणांचे मुख्य कारण म्हणजे युरिक ॲसिड वाढणे हे आहे. ७ मिलीग्राम/ डीएलची वाढ उच्च युरिक ॲसिड दर्शविते. युरिक ॲसिडची पातळी सहज कशी कमी करायची, जाणून घ्या.
युरिक ॲसिडची पातळी वाढल्यास रेड मीट, सीफूडचे सेवन कमी करावे. अल्कोहोल आणि साखरयुक्त पेयांचे सेवन कमी करावे.
उच्च रक्तदाब, तणाव किंवा इतर औषधे देखील हाय युरिक ॲसिडची पातळीला कारणीभूत ठरू शकतात. अनुवांशिक घटक देखील युरिक ॲसिड वाढवू शकतात. त्यामुळे स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आणि तणावमुक्त राहणे गरजेचे आहे.
डिहायड्रेशन हे युरिक ॲसिड वाढण्याचे आणखी एक कारण आहे. जर आपण वर्षभर पुरेसे पाणी पिले नाही, विशेषत: उन्हाळ्यात तर शरीर डिहायड्रेट होते आणि मूत्रपिंड युरिक ॲसिड उत्सर्जित करण्यास असमर्थ होतात.
भाज्या आणि फळांचा दैनंदिन आहारात समावेश करावा. कमी चरबीयुक्त आणि संपूर्ण धान्य असलेले आहार फॉलो करून आपण युरिक ॲसिडपासून मुक्त होऊ शकता.
नियमित व्यायामाद्वारे आपले वजन नियंत्रित ठेवा. वजन जास्त असल्याने युरिक ॲसिडची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. व्यायामासोबतच दररोज ५ ते १० ग्रॅम फायबरचे सेवन केल्यास युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहील.