बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार स्वतःचे स्टंट स्वतःच करतो. स्वतःचे स्वतः स्टंट करूनच प्रेक्षकांना चित्रपटातील त्या दृश्याची खरी अनुभूती देता येते, असे अक्षय कुमार म्हणतो. अक्षय कुमार सध्या त्याच्या 'स्काय फोर्स' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आगामी काळात त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत, ज्यात तो धोकादायक स्टंट करताना दिसणार आहे. चला तर मग जाणून घेऊया अक्षय कुमारच्या काही खतरनाक स्टंट्सबद्दल…
२००९ मध्ये आलेल्या 'ब्लू' चित्रपटातील एक सीन शूट करण्याचा प्रयत्न करत असताना, अक्षय कुमार धोकादायक शार्कमध्ये समुद्रात घुसला होता. अक्षय कुमारला या सीनसाठी बॉडी डबल घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण त्याने हा शॉट स्वतः दिला.
अक्षय कुमारचा १९९६मध्ये आलेला 'खिलाडियों का खिलाडी' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटात अक्षय कुमारने त्याच्यापेक्षा जास्त वजनदार कुस्तीपटू हवेत उंचावला होता. मात्र, हा सीन देताना त्याचे हाड सरकले होते.
अक्षय कुमारच्या २००८ मध्ये आलेल्या 'सिंग इज किंग' या चित्रपटात तो धमाकेदार ॲक्शन आणि कॉमेडी करताना दिसला होता. या चित्रपटातील एक सीन करताना अक्षय कुमारने ११० फूट उंचीवरून एका लिफ्टवरून दुसऱ्या लिफ्टवर उडी मारली होती. धक्कादायक बाब म्हणजे या सीन दरम्यान त्याने कोणत्याही हार्नेस किंवा सेफ्टी केबलचा वापर केला नाही.
जेव्हा प्रेक्षकांना असे वाटू लागते की, अक्षय कुमार हे करू शकत नाही, तेव्हा तो काहीतरी धक्कादायक करून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतो. 'तसवीर' चित्रपटासाठी अक्षय कुमारने १६० फूट उंचीवरून उडी मारली होती. त्यावेळी त्याची हिंमत पाहून दिग्दर्शक आणि निर्मातेही चिंतेत होते.
'सिंग इज किंग' प्रमाणेच अक्षय कुमारने 'सिंग इज ब्लिंग'साठीही प्राणघातक स्टंट केला होता, ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. अक्षय कुमारने चित्रपटातील एका सीनसाठी जळत्या रिंगवरून उडी मारली होती. अक्षय कुमारने स्वतः हा स्टंट पूर्ण केला होता.
रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये ॲक्शन भरपूर असते, पण 'सूर्यवंशी'मध्ये दिग्दर्शकाला प्रभावित करण्यासाठी अक्षय कुमारने कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय हेलिकॉप्टरमधून लटकण्याचा शॉट दिला होता.