कार्तिकी एकादशी निमीत्त विविध उत्सव होत असतात. तसाच जळगाव शहरात देखील जळगावचे ग्रामदैवत असलेले श्रीराम मंदिर संस्थांच्या १५१ वर्षाची अखंड परंपरा असलेला श्रीराम रथोत्सव आज मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
जळगावच्या जुन्या गावातील रामपेठेतील प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर हे ग्रामदैवत मानले जाते. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून वहनोत्सव साजरा होत असतो. जलग्राम प्रदक्षिणा घालताना गावात ठिकठिकाणी भजन- भारूड, पानसुपारीचा कार्यक्रम होतो. वहनावर विविध प्राणिमात्रांसह देवी-देवतांच्या मूर्ती असतात.
कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला रथोत्सव साजरा झाल्यानंतर कार्तिकी शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवाचा समारोप होतो. यामुळे जळगावनगरीत पंधरा दिवसांचा दीपोत्सव व आनंदोत्सव साजरा होत असतो. झेंडूच्या फुलांचा हारांनी हा रथोत्सव आकर्षक असा सजवला जातो.
वंशपरंपरेने हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराजांच्या हस्ते श्रीराम रथाचे पूजन व महाआरती झाली. त्यानंतर श्रीराम रथावर आरुढ होणारी प्रभू श्रीरामचंद्रांची उत्सव मूर्तीची आरती होऊन रथावर मूर्ती विराजमान झाली असून, परंपरेनुसार रथावर गरुड, मारुती, अर्जुन, दोन घोडे आदी मुर्त्या असतात.
कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक,सकाळी सात वाजता महाआरती, सकाळी साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन झाले असून, दुपारी १२ वाजता रथोत्सवाला सुरवात झाली आहे.