अभिनेत्री जुई गडकरी हिने ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात आणि घरात जागा मिळवली आहे. अभिनेत्री जुई गडकरी हिने ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. अनेक आव्हानांना सामोरे जात तिनं आज हे यशस्वी स्थान गाठलं आहे. मात्र तिच्यासाठी हे यश मिळवणं फार सोपं नव्हतं. तिचा हा प्रवास खूपच चढ-उतारांनी भरलेला होता. प्रत्येक कलाकाराला सुरुवातीच्या काळात चांगले वाईट अनुभव येत असतात. अनेक जण या सगळ्या अनुभवांना सामोरे जात स्वतःला सिद्ध करतात.
जुई गडकरी हिला देखील अशाच काही चांगल्या वाईट अनुभवांमधून खूप काही शिकायला मिळालं असल्याच ती स्वतः देखील नेहमी सांगते. नुकत्याच एका मुलाखतीत जुई गडकरी हिने करिअरच्या सुरुवातीच्या काळात लोकांकडून तिला कशी वागणूक मिळाली यावर भाष्य केलं आहे. नुकतीच जुई गडकरीने एका यूट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या आयुष्यातील काही नकारात्मक अनुभवांविषयी प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना जुई म्हणाली की, ‘अशा नकारात्मक अनुभव माझ्या आयुष्यात खूप आहेत. पण करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला उंची आणि आवाजावरून अनेकदा हिणवले गेले. इतकंच नाही, तर माझ्या रंगावरून देखील मला अनेकदा टोमणे ऐकायला मिळाले आहेत.’
आपल्या वाईट अनुभवांमधील एक किस्सा सांगताना जुई म्हणाली की, ‘मला माझ्या उंचीवरून आणि त्वचेच्या रंगावरून अनेकदा हिणवण्यात यायचं. तर माझा आवाज हा बारीक असल्यामुळे त्याच्यावरूनही अनेक लोक मला टोमणे मारायचे. मी लहानपणापासून गायन करत असल्यामुळे माझा आवाज हा सुरुवातीपासूनच बारीक होता. भसाड्या आणि मोठ्या आवाजात बोलणं मला अजिबातच जमत नाही.’
आवाजावरूनही मला अनेकदा बोलले गेले असल्याचे जुई गडकरी म्हणाली. सुरुवातीला माझ्या कपड्यांच्या स्टाईलवरून देखील मला बोलले जायचे. एखादी अभिनेत्री असे कपडे घालते का?, इतकी फ्लॅट दिसते का?, असं देखील म्हटलं जातं होतं.
कधीकाळी तर मी रंगावरून देखील लोकांची बोलणी ऐकली आहे. मी आले की, ‘काळी आली’ असे देखील लोक म्हणायचे. मात्र, आता या अनुभवातून पुढे जाताना मला या सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे. आता कुणाच्याही काहीही बोलण्याने मला फरक पडत नाही. पण, एक नवखी कलाकार आणि त्यातही मुलगी म्हणून, मी या क्षेत्रात आले, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर काय परिणाम झाला असेल, याचा कोणीही कधीच विचार केला नाही, असं जुई गडकरी म्हणाली.