हिंदू धर्मात बाळाच्या प्रत्येक पावलावर विविध विधी करण्याची प्रथा आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला जन्मानंतर १६ संस्कार दिले जातात. आणि त्यासाठी एक निश्चित विधी केला जातो. मुंडन म्हणजेच जावळ काढणे हा या १६ विधींपैकीच एक आहे.
शास्त्रानुसार, मुलासाठी 'मुंडन'चे संस्कार करणे अर्थातच जावळ काढणे खूप महत्वाचे आहे. जावळ काढल्याने, मुलाला मागील जन्माच्या कर्जापासून आणि पापांपासून मुक्ती मिळते अशी यामागची मान्यता आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, मुंडन म्हणजेच मुलांचे केस कापल्याने केस दाट आणि चांगले येतात.
मुलांचे जावळ काढायच्यावेळी ते नेमकं कोणत्या वयात करावं? कोणत्या वयात केल्यास योग्य असते? असे प्रश्न अनेकांना पडतात. आपण आज त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
काही कुटुंबांमध्ये, बाळाच्या जन्माला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांचे जावळ काढले जाते. तर काही कुटुंबांमध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी बाळाचे मुंडन केले जाते.
दुसरीकडे डक्टरांच्या म्हणण्यानुसार, बाळाचे जावळ काढण्यासाठी योग्य वय १ ते ३ वर्षे आहे. या काळात जन्मानंतर बाळाच्या डोक्यातील असलेली केसांची छिद्रे बंद होतात. त्यामुळे केस कापण्यास कोणतीही अडचण येत नाही.
डॉक्टरांच्या मते, जन्मानंतर लगेचच बाळाच्या डोक्याची हाडे मानेशी व्यवस्थित जोडलेली नसतात. त्यामुळे बाळाचे डोके इकडे तिकडे हलत राहते. अशा स्थितीत केस कापण्यासाठी किंवा मुंडण करण्यासाठी बाळाच्या डोक्यावर हात ठेवल्यास हाडांना इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे १ ते ३ वर्षांच्या वयात जावळ केलेले चांगले असते.