पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे, परंतु ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाईल. आयसीसीची ही मेगा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे, परंतु दरम्यान, काही मोठे खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत, आपण अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे एकतर चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडले आहेत किंवा बाहेर जाऊ शकतात.
सॅम अयुब -पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा स्टार खेळाडू सॅम अयुब आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही. दुखापत होण्यापूर्वी सॅम पाकिस्तानसाठी धावा काढत होता, पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर क्षेत्ररक्षण करताना त्याला गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे त्याला ६ आठवडे मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.
जसप्रीत बुमराह- भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याबाबत साशंकता आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहला पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या होम वनडे मालिकेतही खेळत नाहीये. मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला असला तरी, बीसीसीआयने आपल्या अद्ययावत संघात बुमराहच्या नावाचा समावेश केलेला नाही.
पॅट कमिन्स- मिचेल मार्शशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचेही चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणे कठीण मानले जात आहे. भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पॅट कमिन्सला दुखापत झाली होती. घोट्याच्या दुखापतीतून तो सावरू शकलेला नाही. याच कारणामुळे तो श्रीलंका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतही सहभागी होणार नाहीये. यासोबतच ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले की, कमिन्सची दुखापत पूर्णपणे बरी झालेली नाही आणि त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
जोश हेजलवूड- या यादीत वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडचाही समावेश झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात जोश हेझलवूडचाही समावेश आहे, मात्र हेझलवूडचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे संघाच्या प्रशिक्षकाने स्पष्टपणे सांगितले आहे. हेजलवूडला भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही दुखापत झाली होती.
मिचेल मार्श- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. अष्टपैलू मिचेल मार्श स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मिशेल मार्श त्याच्या पाठीच्या दुखापतीतून सावरलेला नाही आणि फिजिओने त्याला सध्या क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मिचेल मार्श आता ऑस्ट्रेलियासाठी उपलब्ध असणार नाही.