कधी शांत तर कधी खवळलेला असणाऱ्या समुद्रातून बोटीतून प्रवास करण्याचे खलाशांना नेहमीच आकर्षण असते. समुद्र प्रवासाचा आनंद घेत असतानाच प्रवासाती आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय नौसेनेच्या दोन महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रुपा ए या दोघी जणी आजपासून समुद्र प्रवासाला रवाना झाल्या. ‘नाविका सागर परिक्रमा’ असे या परिक्रमेचे नाव असून 'आयएनएस तरिणी' या खास बोटातून दोन महिला अधिकारी तब्बल ४० हजार किमी समुद्र प्रवास करणार आहे.
हिंद महासागर, प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरातून या दोन महिला अधिकाऱ्यांचा समुद्र प्रवास होणार आहे. यापूर्वी १० सप्टेंबर २०१७ ते २१ मे २०१८ दरम्यान भारतीय नौसेनेच्या सहा महिला अधिकाऱ्यांनी INSV तरिणीद्वारे ४० हजार किमीची ‘नाविका सागर परिक्रमा’ ही पहिली सागरी प्रवास मोहिम राबवली होती. दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी गेले तीन वर्ष सागरी नौकानयनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले असून आत्तापर्यंत ७०,३७६ किमी सागरी नौकानयन करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सागरी नौकानयनाचे विविध पैलू हवामानशास्त्र, नेव्हिगेशन, कठीण परिस्थितीत जगण्याची तंत्र आणि समुद्रातील औषधोपचार याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
‘नाविका सागर परिक्रमा -२’ ची सुरूवात आज गोवा येथून झाली. मे २०२५ पर्यंत पुढील सात महिने INSV तरिणी ही बोट समुद्रात प्रवास करणार आहे. सुरू. रहाणार आहे. यादरम्यान आवश्यकता भासल्यास बोटील इंधन भरणे आणि बोटीच्या देखभाल दुरुस्तीसाठी चार बंदरांवर थांबणार आहे. यात ऑस्ट्रेलियातील फ्रेमेंटल बंदर, न्यूझिलंडमधील लॅटलेटन बंदर, फॉकलंड बेटांवरील स्टॅनले बंदर आणि दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन बंदरांवर थांबणार आहे.
INSV तारिणी ही ५६ फूट लांब नौकानयन करण्यासाठीची बोट असून गोव्यातील अॅक्वॅरियस शिपयार्ड कंपनीने याची बांधणी केली आहे. ही बोट १८ फेब्रुवारी २०१७ साली भारतीय नौदलात दाखल करण्यात आली होती. आतापर्यंत या बोटीचा एकूण १ लाख २२ हजार २२३ किमी सागरी प्रवास झाला आहे. २०१७ साली या बोटीद्वारे पहिली ‘नाविका सागर परिक्रमा पार पडली होती. त्यानंतर या बोटीचा गोवा ते रिओ आणि गोवा ते पोर्ट लुईस असा प्रवास झाला आहे. या बोटीत अत्याधुनिक अशी नेव्हिगेशन प्रणाली, सुरक्षा यंत्रणा आणि दळणवळणाची उपकरणे आहेत. ही बोट अलीकडेच पुन्हा अपग्रेड करण्यात आली आहे.