भारतीय संघ डोमिनिका येथे वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी (१२ जूलै) वेस्ट इंडिजचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक ५ बळी घेतले.
तेजनारायण चंद्रपॉलची विकेट घेत अश्विनने एक अनोखा विक्रम रचला. अश्विनने तेजनारायणचे वडील शिवनारायण यांनाही बाद केले होते. बाप-लेकाला बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विनचा समावेश झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये असे ५ गोलंदाज आहेत, ज्यांनी बाप-लेकाची विकेट काढली आहे.
इयान बॉथम
इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू इयान बॉथम हा पिता-पुत्र जोडीला कसोटीत बाद करणारा पहिला गोलंदाज होता. त्याने न्यूझीलंडच्या लान्स केर्न्स आणि नंतर ख्रिस केर्न्सला बाद केले.
वसीम अक्रम
वसीम अक्रम हा पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम स्विंग गोलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. अक्रमने लान्स आणि ख्रिस केन्सची विकेट घेतली आहे. लान्सने ४३ कसोटी सामने खेळले तर ख्रिसने ६२ कसोटी सामने खेळले.
मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा बाप-लेकाला कसोटी क्रिकेटमध्ये बाद करणारा तिसरा गोलंदाज ठरला. स्टार्कने शिवनारायण चंद्रपॉलला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बाद केले. गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या कसोटी मालिकेत त्याने तेजनारायणचीही विकेट घेतली.
सायमन हार्मर
सायमन हार्मरने हे नाव तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. कारण सायमन हार्मरने आतापर्यंत फक्त १० कसोटी खेळल्या आहेत. २०१५ मध्ये पदार्पणाच्या सामन्यात त्याने शिवनारायण चंद्रपॉलची विकेट घेतली होती. या वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत हार्मरने तेजनारायणला बाद केले होते.
रविचंद्रन अश्विन
आता या यादीत भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे नाव जोडले गेले आहे. अश्विनने २०११ आणि २०१३ मध्ये चंद्रपॉलला बाद केले होते. आता २०२३ मध्ये, तेजनारायणला बाद केले. बाप-लेकाला बाद करणारा अश्विन पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.