आर प्रेमदासा स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेने ५० षटकांत ८ गडी गमावून २३० धावा केल्या. याला प्रत्युत्तरात टीम इंडिया ४७.५ षटकांत २३० धावांवर गारद झाली. अशाप्रकारे हा सामना बरोबरीत संपला. मात्र, पहिली वनडे चढ-उतारांनी भरलेली होती. सामना भारताने जवळपास जिंकला होता, पण ४८व्या षटकात चरिथ असलंकाने बाजी पाटलटली.
शेवटच्या १८ चेंडूत भारताला विजयासाठी फक्त ५ धावांची गरज होती. भारताकडून शिवम दुबे आणि मोहम्मद सिराज क्रीजवर होते. यानंतर अर्शदीप सिंगला यायचे बाकी होते. कर्णधार चरिथ असालंका श्रीलंकेसाठी ४८ वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील पहिल्या २ चेंडूंवर शिवम दुबेला एकही धाव करता आली नाही.
पण तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारला. या चौकारानंतर भारतीय खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये आनंदाने उड्या मारल्या. भारतीय संघाचा विजय जवळपास निश्चित होता, पण शेवटचा ट्विस्ट बाकी होता.
चरित असलंकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर चौथ्या चेंडूवर शिवम दुबे बाद झाला. मात्र, शिवम दुबेला पंचांनी आऊट दिले नाही, तर श्रीलंकन खेळाडूंच्या रिव्ह्यूमध्ये त्याला आऊट घोषित करण्यात आले. यानंतर भारताला फक्त १ धाव काढायची होती. अर्शदीप सिंग नवा फलंदाज म्हणून आला. पण तो मोठा फटका मारण्याच्या नादात पहिल्याच चेंडूवर बाद झाला.