भारत आणि इंग्लंड यांच्यात आज (२२ जानेवारी) पहिला टी-२० सामना होणार आहे. दोन्ही संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भिडतील. सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी इंग्लंडने आधीच ११ दिग्गजांची निवड केली आहे. इंग्लिश संघ बऱ्यापैकी भक्कम दिसत आहे, पण ५ भारतीय गोलंदाज आहेत जे इंग्लंडला पाणी पाजू शकतात.
रवी बिश्नोई- इंग्लंडचा युवा सेन्सेशन हॅरी ब्रूक लेगस्पिनरसमोर फ्लॉप होतो. २०२३ पासून तो ६ वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लेग स्पिनर्सच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. अशा परिस्थितीत रवी बिश्नोई ब्रुकचा बंदोबस्त करू शकतो.
अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती- भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती देखील जोस बटलरसाठी धोकादायक ठरू शकतात. बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. या दोन्ही फिरकीपटूंनी टी-20 मध्ये बटलरला दोनदा बाद केले आहे. त्याच्यासमोर बटलर नेहमीच दबावात दिसला आहे.
अर्शदीप सिंग- डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग इंग्लिश सलामीवीर बेन डकेटविरुद्ध प्रभावी ठरू शकतो. डकेट गेल्या तीन डावात डावखुरा वेगवान गोलंदाज विरुद्ध दोनदा बाद झाला आहे.
मोहम्मद शमी- इंग्लिश कर्णधार जोस बटलर याची बॅट मोहम्मद शमीसमोर चालत नाही. शमीने ११ टी-20 सामन्यांमध्ये बटलरला तीन वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. अशा स्थितीत बटलरला शमी तंबूत पाठवू शकतो. शमी दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असला तरी त्याची लय कमी झालेली नाही हे त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दाखवून दिले आहे.