भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर मालिकेतील तिसरा कसोटी सामना शनिवार (१४ डिसेंबर) सुरू झाला. आजचा दिवस म्हणजेच कसोटीचा पहिला दिवस पावसाने वाया गेला. मुसळधार पावसामुळे या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ १३.२ षटकांचा खेळ झाला. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने बिनबाद २८ धावा केल्या.
उस्मान ख्वाजा १९ आणि नॅथन मॅकस्विनी ४ धावांवर नाबाद आहेत. या कसोटी सामन्याचा खेळ भारतीय वेळेनुसार पहाटे ५.५० वाजता सुरू होतो, मात्र पावसामुळे आता वेळ बदलण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी पावसामुळे सकाळचे सत्र दोनदा खंडित झाले. पहिली ३० मिनिटे खेळ थांबला. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्यावर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर दिवसाचा खेळ लवकर रद्द करावा लागला. यावेळी चाहते खूपच निराश दिसले. पावसामुळे खेळ पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली.
खेळ लवकर सुरू होणार- पहिल्या दिवशीचा खेळ वाया गेल्यानंतर सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आली आहे. आता उर्वरित ४ दिवसांचा खेळ ठाराविक वेळेपेक्षा अर्धा तास लवकर सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच, आता दुसऱ्या दिवशीचा खेळ भारतीय वेळेनुसार पहाटे ५:१५ वाजता सुरू होणार आहे.
दर्शकांचे पैसे परत केले जातील - गाब्बा कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ १३.२ षटकांचा खेळ झाला. ९० षटकांचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांनी तिकिटे काढली होती. अशा परिस्थितीत आता चाहत्यांना त्यांचे पैसे परत केले जाणार आहेत.
जर खेळ १५ षटकांपेक्षा जास्त झाला असता तर तिकिटाचे पैसे चाहत्यांना परत केले गेले नसते, परंतु खेळ १५ षटकांपेक्षा कमी खेळ झाल्याने तिकिटाचे पैसे परत केले जातील.
दुसऱ्या दिवशी हवामान कसे असेल?- भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता फारच कमी आहे. हवामान अंदाजानुसार, रविवारी पावसाची शक्यता केवळ ८ टक्के आहे, परंतु दिवसभर आकाश ढगाळ राहू शकते. असे असले तरी अनेक वेळा हलक्या पावसामुळे खेळ थांबण्याची शक्यता आहे.