अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यातील किनारी भागांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता सामान्यांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी म्हणजेच आज दुपारी किंवा संध्याकाळी मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना छत्री आणि रेनकोट बाहेर काढावे लागणार आहेत.
ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबईच्या उपनगरीय भागांमध्ये आजपासून पुढील दोन दिवस वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा उत्तर-ईशान्येकडे सरकत आहे. परंतु त्याचा सर्वाधिक परिणाम हा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील किनारी भागांमध्ये होण्याची शक्यता आहे.