मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मंगळवारी सकाळपासून पावसाने रात्रीपासून जोरदार हजेरी लावली आहे. वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे कामावर जाण्यासाठी आज सकाळी घराबाहेर पडलेल्या चाकरमन्यांची चांगलीच तारांबळ उडाली. . मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन्स काही मिनिटांच्या विलंबाने धावत असल्या तरी अद्याप रेल्वे वाहतुकीवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. सकाळी धावपळीच्या वेळेत चाकरम्यानांना छत्र्या घेऊन ऑफिस गाठण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुंबईतील हवामान खात्याने इशारा दिला असून पावसाचा जोर पुढील चार ते पाच तास कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पुढील तीन ते चार तास पावसाचा जोर असेल. वीजा आणि मेघगर्जनेसह हा पाऊस होणार आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे पावसाचा जोर चार ते पाच तास कायम राहणार आहे.
सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. सध्या पावसाच्या सरी अधुनमधून बरसत आहेत. मात्र, पावसाचा जोर आणखी वाढल्यास रस्त्यांवर पाणी साचून रस्ते वाहतूक मंदावू शकते.