कर्नाटकची राजधानी बेंगळुरू शहराला काल रात्री मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. शहरात १२ तासात १८६ मीमी पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात गेल्या वीस वर्षात एवढा जास्त पाऊस पडलेला नाही. बेंगळुरूतील येलाहांका, केंद्रीय विहार परिसराला पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने अनेक वाहने बुडाल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे.
(AFP)बेंगळुरूसारख्या आधुनिक शहरात रस्ते जलमय झाल्यामुळे पायाभूत सुविधांबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. नागरिक सोशल मीडियावर आपली मते व्यक्त करत आहेत. सखल भागातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफच्या तुकड्या शहरात बचावकार्य करत आहेत.
(AFP)बेंगळुरुत पावसाच्या पाण्यातून वाट काढणारी एक ५६ वर्षीय महिला खुल्या गटाराच्या खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाला आहे. ही महिला आपल्या पतीसोबत स्कूटरवर जात होती. समोरून येणाऱ्या एका दुसऱ्या वाहनाने स्कूटरला धडक दिल्याने ती महिला खाली खुल्या गटारात जाऊन पडल्याचे पोलिसांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे बंगळुरूतून उड्डाण घेणारे आणि बेंगळुरूत उतरणाऱ्या विमान सेवांवर परिणाम झाला आहे. दिल्लीहून बेंगळुरूला जाणारे एअर इंडियाचे एक विमान आणि इंडिगोचे चार विमान चेन्नईकडे वळवण्यात आले आहे.
(AFP)बेंगळुरूत येलाहांका परिसर आणि केंद्रीय विहार अपार्टमेंट परिसराला पावसाचा मोठा फटका बसला आहे. येथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहे. रबरी होड्यांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. वरील फोटोत केंद्रीय विहार अपार्टमेंटसमोरील जलमय भाग आणि नागरिकांच्या मदतीला रबरी होड्या घेऊन रस्त्यावर उतरलेले एनडीआरएफचे जवान दिसत आहे.
(PTI)बेंगळुरूत रस्ते जलमय झाल्याने नागरिक रस्ते दुभाजकावरून वाट काढताना दिसत आहेत. दरम्यान, नागरिक पाण्यात अडकले असताना मदतीसाठी प्रशासन अनुपस्थित असल्याची तक्रार सोशल मीडियावर केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री डी शिवकुमार हे सुद्धा वाहतुकीत बराच काळ अडकले होते. प्रशासन सर्वोतोपरी मदत करत असल्याचं शिवकुमार म्हणाले. केंद्रीय विहार अपार्टमेंटमधून बऱ्याच नागरिकांना काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले असल्याचे शिवकुमार म्हणाले.
(PTI)