
माणसाच्या दैनंदिन जीवनात सुखसमृद्धी आणि भरभराट यावी यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी त्या पाच गोष्टी किंवा सवयी सांगितल्या आहेत. या सवयींमुळं जीवनात गरीबी येते. या सवयी मोडल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
सकाळी उशिरा उठणे : रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं हे गरुड पुराणात चुकीचं मानलं गेलं आहे. अशा व्यक्ती स्वभावानं खूप आळशी असतात. सकाळी उशिरा उठल्यामुळं जीवनात यश मिळत नाही. आळशीपणामुळं योग्य वेळ आणि संधी हातातून निसटून जाते. जीवनात प्रगती करायची असेल तर रात्री उशिरा झोपण्याची आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय सर्वप्रथम सोडली पाहिजे.
लोभ-लालसा सोडून द्या : लोभी स्वभावामुळं जीवनात अपयश येण्याची शक्यता जास्त असते. ज्याची नेहमी इतरांच्या संपत्तीवर नजर असते, तो कधीही सुखी होत नाही. अशा व्यक्तींना स्वत:कडं असलेल्या गोष्टींचाही आनंद उपभोगता येत नाही, असं गरुड पुराण सांगतं.
वाईट, नकारार्थी विचारांपासून दूर राहा : गरुड पुराणातील दाखल्यानुसार, इतरांच्या कामाला क्षुल्लक समजण्याची आणि इतरांचं वाईट व्हावं अशी भावना असलेल्या माणसांवर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. तुम्ही इतरांबद्दल चांगला विचार केला नाही, तर तुम्ही स्वत:च्या भल्याचा विचारही करू शकत नाही.


