गणेश जयंती गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. जर तुम्ही गणपतीला घरी आणणार असाल तर लक्षात ठेवा की गणेशाच्या पूजेमध्ये काही फुले आणि पाने निषिद्ध मानली जातात. त्याचबरोबर गणेश चतुर्थीला गणपतीच्या पूजेबरोबरच पंचदेवतांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. या पाच देवांची पूजा करतानाही काही फुले आणि पाने वर्ज्य मानली जातात.
गणपतीला तुळस वगळता सर्व पाने आणि फुले प्रिय आहेत, म्हणून त्याला सर्व पाने आणि फुले अर्पण केली जातात. गणेशाला दूर्वा प्रिय आहे, म्हणून गणेशाला हिरवी दूर्वा अर्पण करावी. जास्वंदाची फुलेही गणेशाला वाहावी. परंतू, गणपतीला कधीही तुळस अर्पण करू नका.
पद्मपुराणात गणेशाच्या पूजेत तुळस वाहायला मनाई आहे :
पद्मपुराणविधीत असे लिहिले आहे की, गणेशाची पूजा “न तुलस्य गणधिपम” अर्थात तुळशीने करू नये. कार्तिक-महात्म्यात असेही म्हटले आहे की, गणेशाला तुळशीपत्रीच्या आणि दुर्गा मातेच्या पूजेत दूर्वाचा समावेश करू नये. पद्मपुराण आणि गणेश पुराणात वर्णिलेल्या कथेनुसार देवी तुळशीने भगवान गणेशाला शाप दिला होता, ज्यामुळे गणेशाच्या पूजेत तुळस अर्पण केली जात नाही.
पद्मपुराणानुसार एकदा भगवान गणेश गंगा नदीच्या काठावर ध्यान करीत बसले होते. इतक्यात तुळशीदेवी तिथे आल्या आणि त्यांची नजर गणेशावर पडली. तुळशी देवींना गणपती आवडला आणि त्यांनी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. गणेशजींनी हा प्रस्ताव नाकारला. हे पाहून तुळशी देवींना राग आला आणि त्यांनी गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील.शिवपुराणानुसार भगवान गणेशाला रिद्धी आणि सिद्धी या दोन पत्नी होत्या. याशिवाय बाप्पाच्या शुभ आणि लाभ या दोन मुलांचाही उल्लेख आहे. या कारणास्तव, तेव्हापासून आजपर्यंत तुळशीचा वापर गणेशाच्या कोणत्याही पूजेत केला जात नाही.