फुटबॉलला भारतीयांमध्ये लोकप्रिय करणारा आणि मैदानात एकापेक्षा एक गोल करणारा सुनील छेत्री आपल्याच कोचच्या मुलीच्या प्रेमात सेल्फ गोल झाला. सुनील छेत्रीची लव्हस्टोरी खूपच फिल्मी असून तो मोहन बागान क्लबच्या प्रशिक्षकाच्या मुलीच्या प्रेमात पडला.
सुनील आणि सोनमचे २०१७ मध्ये लग्न झाले. याआधी ते १३ वर्षे एकमेकांना डेट करत होते. सुनील आणि सोनमची प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.
वास्तविक सोनम ही सुनील छेत्रीचे प्रशिक्षक सुब्रतो भट्टाचार्य यांची मुलगी आहे. छेत्री एकेकाळी मोहन बागानमध्ये सुब्रत भट्टाचार्यच्या नेतृत्वाखाली खेळला होता.
सुनील छेत्रीने एका मुलाखतीत सोनमसोबतच्या भेटीचा किस्सा शेअर केला होता. छेत्रीने सांगितले की, तिचे वडील माझे प्रशिक्षक होते. त्यांच्या घरात माझ्याबद्दल अनेकदा चर्चा व्हायची, त्यानंतर सोनमला माझ्याबाबत जाणून घेण्यात रस वाटू लागला. त्यावेळी सोनम फक्त १५ आणि मी १८ वर्षांची होतो.
छेत्रीने सांगितले होते की, सोनमने तिच्या वडिलांच्या फोनमधून माझा नंबर चोरला होता आणि नंतर मी तुझी मोठी फॅन आहे असे सांगून मला मेसेज केला. यानंतर तुला भेटायचे आहे, असेही सोनमने सांगितले होते. ही मुलगी कोण आहे हे मला माहीत नव्हते. पण सोनमने ज्या सहजतेने विचारले होते, त्यामुळे मी तिला भेटण्यास नकार देऊ शकलो नाही.
सततच्या प्रवासामुळे सुनील छेत्री आणि सोनम यांची भेट फार कमी होत असे. वर्षातून दोन-तीन वेळाच त्यांना भेटता येत असे. या कारणास्तव ते सिनेमागृहांमध्ये गुपचूप भेटत असत. पण ते दोघे कधीच एकत्र आत गेले नाहीत.
बऱ्याच वर्षांनंतर छेत्रीने सोनमसोबत लग्न करण्याबाबत प्रशिक्षकाशी बोलण्याचे धाडस केले. मात्र, छेत्री हे बोलण्यासाठी जेवढा घाबरत होता तसे काहीही झाले नाही. काही वेळ विचार केल्यावर प्रशिक्षकांनी लग्नाला हो म्हटलं.
सुनील छेत्री आणि सोनम भट्टाचार्य यांनाही एक मुलगा आहे, ज्याचा जन्म गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी झाला. छेत्री आणि सोनमच्या मुलाचे नाव ध्रुव आहे.
३९ वर्षीय सुनील छेत्रीने आपल्या कारकिर्दीत एकूण १४५ वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, ज्यामध्ये त्याने ९३ गोल केले आहेत.