
धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे नुकतेच फुले झाडे आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कुंड्यांमध्ये वाढविलेली फुलझाडे, फळझाडे, फळभाज्यांची झाडे, औषधी वनस्पती प्रदर्शित करण्यात आले होते.
प्रदर्शनात मांडण्यात आलेले विविध प्रकारचे बोन्साय झाड नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. यात कृष्णवड तसेच मुंबई बटुवृक्ष या दुर्मीळ प्रजातीची झाडे नागरिकांना पहायला मिळाली.
MMRDA चे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्रदर्शनाचे यंदाचे पहिलेच वर्ष आहे. मुंबईकरांसाठी प्रदर्शन विनामूल्य होते.
कुंड्यामध्ये वाढलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, विदेशी वनस्पती, फळझाडे, हंगामी फुलझाडे, शोभिवंत पानाची झाडे, सुगंधी व औषधी वनस्पती, गुलाबाची रोपे यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळाले. शीव, कुर्ला, धारावी परिसरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी या पुष्प प्रदर्शनाला भेट देऊन विविध जातीच्या झाडांविषयी माहिती जाणून घेतली.
या प्रदर्शनात मुंबई महानगरपालिका, मुंबई रोझ सोसायटी, इंडियन बोन्साय सोसायटी सोबतच ‘सनटेक’, ‘गोदरेज’, ‘हिरानंदानी’, ‘BARC’, ‘टाटा पॉवर’, ‘सोमय्या महाविद्यालय’ इत्यादी संस्थांनी भाग घेतला होता. या प्रदर्शनासोबत विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आली होती.



