कतारमध्ये खेळल्या जात असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये फ्रान्सने मोरोक्कोचा २-० असा पराभव केला. त्यामुळे मोरोक्कोचे फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. फ्रान्सकडून झालेला हा पराभव मोरोक्कन चाहत्यांना पचला नाही. त्यांनी फ्रान्स आणि ब्रुसेल्सच्या रस्त्यांवर तुफान राडा घातला. यावेळी मोरोक्कोच्या चाहत्यांनी पोलिसांशीदेखील धक्काबुक्की केली.
सेमी फायनलच्या सामन्यानंतर अनेक ठिकाणी फ्रान्स आणि मोरोक्कोच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. अनेक ठिकाणी हिंसक चकमकीही झाल्या. यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुराचा वापर केला. यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मोरोक्कन चाहत्यांनी पॅरिसमध्ये फ्रेंच ध्वज स्वता:भोवती गुंडाळलेल्या पोलिसांवर फटाके आणि इतर वस्तू फेकल्या. कचऱ्याच्या पिशव्या आणि पुठ्ठ्याचे बॉक्स चाहत्यांनी पेटवून दिले. त्यानंतर प्रत्युत्तरात पोलिसांनी वॉटर कॅनन आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक मोरोक्कन चाहत्यांना अटक केली आहे.
फ्रान्स फायनलध्ये पोहोचल्यानंतर पॅरिसमध्ये चाहत्यांनी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा केला. पण अनेक ठिकाणी मोरोक्कन चाहत्यांशी त्यांचे भांडण झाले. फ्रान्सला मोरोक्कोचे संरक्षक राज्य मानले जाते, अशा परिस्थितीत मोरोक्कन नागरिक मोठ्या संख्येने येथे राहतात.
बेल्जियममधील ब्रुसेल्समध्येदेखील मोरोक्कन चाहत्यांनी गोंधळा घातला. सामनयानंतर तेथील साउथ स्टेशनवर मोरोक्कोचे चाहते जमले, त्यांनी प्रचंड गोंधळ घातला आणि जाळपोळही सुरू केली.
पॅरिसमधील घटनेनंतर फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमॅनिन यांना एक निवेदन जारी करावे लागले आहे. यात ते म्हणाले की, “फ्रेंच चाहत्यांप्रमाणेच मोरोक्कन चाहतेही आमचे लोक आहेत. विजयाचा आनंद आणि पराभवाचे दु:ख साजरे करायला प्रत्येकजण मोकळा आहे. पण हे सर्व चांगल्या कायद्याच्या चौकटीत राहून झाले पाहिजे”.
दरम्यान, याआधी १० डिसेंबरलाही पॅरिसमध्ये अशा प्रकारची हाणामारी झाली होती. त्यावेली फिफामध्ये मोरोक्कोने पोर्तुगालचा पराभव केला होता. यानंतर पोलिसांनी सुरक्षेची सर्व व्यवस्था केली होती.
