कोकणातील सिंधुदुर्गचे भाजप खासदार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबाने जिल्ह्यातील आपला बालेकिल्ला भक्कम केल्याचे या निवडणूक निकालातून दिसून आले. नारायण राणे यांचा मोठा मुलगा निलेश राणे यांनी कुडाळ मतदारसंघातून शिवसेना-शिंदे गटाकडून निवडणूक लढत विजय संपादन केला. निलेश यांनी शिवसेना-उबाठाचे वैभव नाईक यांचा ८१७६ मतांनी पराभव केला. तर राणे यांचा धाकटा मुलगा नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवत शिवसेना-उबाठाचे संदेश पारकर यांचा ५८ हजार मतांनी पराभव केला.
जालना जिल्ह्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा मुलगा संतोष दानवे आणि मुलगी संजना दानवे जाधव वेगवेगळ्या पक्षातून आमदार म्हणून निवडून आले. भोकरदनमधून भाजपचे संतोष दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे चंद्रकांत दानवे यांचा २३ हजार मतांनी पराभव केला. तर कन्नड मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या संजना दानवे-जाधव यांनी त्यांचे पती, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा १८ हजार मतांनी पराभव केला.
नांदेड हा चव्हाण कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी, भाजप उमेदवार श्रीजया चव्हाण यांनी भोकर मतदारसंघात काँग्रेसच्या तिरुपती कोंडेकर यांचा ५० हजार मतांनी पराभव केला.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघात बाजी मारली. आदित्य यांनी शिवसेना -शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांचा ८८०१ मतांनी पराभव केला. तर आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू वरुण सरदेसाई यांनी मुंबईतील वांद्रे (पूर्व) मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दिकी यांचा ११,३६५ मतांनी पराभव करून विजय संपादन केला.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी त्यांचे सख्खे पुतणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा १ लाख ८९९ मतांनी पराभव केला. तर शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून अजित पवार यांचे दुसरे पुतणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार हे १२४३ मतांनी निवडून आले आहे. बारामतीच्या पवार घराण्यात शरद पवार हे राज्यसभेचे सदस्य असून त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. तर अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या सुद्धा राज्यसभेच्या खासदार आहेत.
मुंबईतील धारावी मतदारसंघ हा काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी खासदार राहिलेले दिवंगत एकनाथ गायकवाड यांचा बालेकिल्ला. या मतदारसंघात एकनाथ गायकवाड यांची मुलगी ज्योती गायकवाड हिने शिवसेना-शिंदे गटाचे राजेश खंदारे यांचा २३ हजार मतांनी पराभव केला आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत धारावीच्या आमदार असलेल्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर वर्षा यांनी धारावी मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिली होता. त्यानंतर कॉंग्रेसने वर्षा यांची बहीण ज्योती यांना उमेदवारी दिली होती.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भूमरे कुटुंबाने पैठणमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. शिवसेना-शिंदे गटाचे छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा, शिवसेना-शिंदे गटाचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे यांनी शिवसेना- ठाकरे गटाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांचा २९ हजार मतांनी पराभव केला.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांची मुलगी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे या विजयी झाल्या. अदिती यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल नवगाने यांचा ७७ हजार मतांनी पराभव केला. अदिती यांचे वडील सुनील तटकरे हे रायगडचे खासदार आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या ताज्या निकालातून राज्यातली राजकीय घराणेशाहीचे बालेकिल्ले अधिकच मजबूत झाल्याचे दिसून आले आहे. यात सर्वच पक्षांमध्ये असे बालेकिल्ले निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच कौटुंबिक वारसदारांना गड जिंकता आलेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीममध्ये पराभव पत्करावा लागला, तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण राखता आलेले नाही.