कामावर स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी बरेच लोक वारंवार कॉफी पितात. कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु जर तुम्ही एकाच ठिकाणी बराच वेळ बसून काम करत असाल तर तुम्ही कॉफी पिण्याच्या फायद्यांपासून वंचित राहू शकता. बायोमेड सेंट्रल पब्लिक हेल्थ या नियतकालिकात नुकताच १० हजार प्रौढांचा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.
संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक कॉफी पितात तसेच शारीरिक अॅक्टिव्हिटी करतात, त्यांचा मृत्यूदर खूप कमी आहे. पण जर तुम्ही कॉफी पिऊन दिवसभर एकाच ठिकाणी ८ तासांपेक्षा जास्त वेळ बसला तर तुमच्या मृत्यूचा धोका जवळपास ६० टक्क्यांनी वाढतो.
अनेकांना असं वाटतं की बसल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, कॉफी प्यायल्याने तो कमी होईल. पण कॉफी पिण्याबरोबरच व्यायाम केला नाही तर फायदा काहीच होणार नाही. कॉफी पिण्याबरोबरच एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहिल्याने कॉफी न पिण्यासारखेच परिणाम मिळतात.
चीनमधील सूचो युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी सांगितले की, जे लोक कॉफी पितात परंतु दिवसातून कमीत कमी ६ तास एकाच ठिकाणी बसतात, त्यांच्या तुलनेत जे कॉफी पितात परंतु जास्त वेळ एकाच ठिकाणी बसत नाहीत त्यांना मृत्यूचा धोका २४ टक्के कमी असतो.
संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक कॉफी पितात, त्यांचा हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचा धोका खूपच कमी असतो. जर तुम्ही दिवसातून कमीत कमी ३ कप कॉफी प्यायली तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका अजिबात राहणार नाही. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आणि पॉलिफेनॉल शरीरातील विविध समस्या कमी करतात. परंतु कॉफीमुळे मृत्यूचा धोका कसा कमी होतो हे संशोधकांना अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संशोधकांना असेही आढळले आहे की जे लोक जास्त वेळ एकाच ठिकाणी बसतात, त्यांच्या मृत्यूचा धोका ४० टक्क्यांपेक्षा जास्त असतो, विशेषत: हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचा धोका सुमारे ८० टक्के असतो. त्यामुळे संतुलित आहार घेण्याबरोबरच दररोज शारीरिक व्यायाम करावा. जेणेकरून कोणताही आजार आपल्या शरीराला बांधून ठेवू शकणार नाही.