पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. असे असले तरी खडकवासला धरण साखळीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे मुठा नदी तुडुंब भरून वाहत आहे. रविवारी नदी पात्राच्या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते.
काल सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्त्याशेजारील एकता नगर परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी घुसले होते. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या नागरिकांना लष्कराच्या पथकाने सुरक्षित स्थळी हलवले.
रविवारी संध्याकाळी ५ वाजता खडकवासला धरणातून ४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता. हा विसर्ग आजही कायम असल्याने मुठा नदी पात्र भरून वाहत आहे. येतील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, नदीचे पात्र पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात झेडब्रिजवर गर्दी केली होती.
रविवारी बोटीतून सोसायट्यांमध्ये जाऊन सतर्कतेच्या सूचना देण्यास सुरुवात करण्यात आली होती. तर काही सोसायट्यामधील नागरिक त्याच्या घरातच थांबले होते. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी एनडीआरएफचे पथक, लष्कर आणि अग्निशामक दलाने प्रयत्न सुरू होते.
पुण्यातील धरण साखळीत पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येणार विसर्ग हा ३५ हजारांवरून हा विसर्ग 45 हजार क्युसेक करण्यात आला होता.
पुणे आणि घाट परिसरात आज देखील मोठ्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काल अजित पवार यांनी खडकवासला धरण हे ६५ टक्के रिकामे करण्याचे आदेश दिले होते.