राज्यातील आज सर्वत्र गणेश चतुर्थीची उत्साह असून घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानीही बासरीच्या मंगलमय सुरात बाप्पांचं आगमन झालं. राज ठाकरेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सहपत्निक राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले होते.
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांचे राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांनी स्वागत केले.
मुंबई-गोवा महामार्ग व मराठा आरक्षण आंदोलनावरून राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. मात्र आज देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे.
गेल्यावर्षी महायुतीचे सरकार स्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी विधीवत गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांच्या फडणवीसांच्या आई, पत्नी अमृता आणि मुलगी दिविजासह इतर कुटुंबीय उपस्थित होते. आपल्या राज्यासमोर आणि देशासमोर जी विघ्नं आहेत ती गणेशाचं वंदन केलं की दूर होतात अशा भावना यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवल्या.