मुंबईतील लोअर परळ भागातील ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील डिलाईल पूल अखेर वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाचे उदघाटन मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते नुकतेच झाले. या पुलाच्या उदघाटनाचा विषय गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादात अडकला होता. पूल तयार होऊनसुद्धा केवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) दरम्यान श्रेय घेण्यावरून सुरू असलेल्या ओढाताणीमुळे पुलाचे उदघाटन होत नसल्याचा आरोप वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता.
लोअर परळ येथील डिलाइल पूल बांधून तयार झालेला असताना श्रेय लाटण्याच्या मुद्दावरून राज्य सरकार उदघाटन करत नसल्याचा आरोप करत माजी मंत्री आणि शिवसेनेचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर रोजी रात्री स्वतः या पुलाचे उदघाटन केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या पुलावरून काही काळ वाहनांची रहदारी सुरू झाली होती. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पुलावरील रहदारी थांबवून पुलाचे बेकायदेशीररित्या उदघाटन केल्याबद्दल आमदार आदित्य. ठाकरे यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आदित्य यांच्यासोबत ठाकरे गटाचे विधानपरिषद सदस्य सचिन अहिर, सुनील शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर या देखील उपस्थित होत्या.
मुंबईतील लोअर परळ येथील डिलाइल रोडवरील पुलाच्या उदघाटनाचा कार्यक्रम गेल्या दोन वर्षात पाच वेळा पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. हा पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी सुरू करावा या मागणीसाठी सप्टेंबर महिन्यात स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते.
(Hindustan Times)Top View - उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा दुवा असलेला हा पूल १९२१ साली बांधण्यात आला होता. परंतु २०१८ साली आयआयटी- मुंबईच्या टीमने केलेल्या ऑडिटमध्ये पूल असुरक्षित असल्याचे आढळले होते. त्यामुळे तत्काळ दुरूस्तीसाठी पूल बंद करण्यात आला होता. रेल्वे आणि महापालिकेच्या अंतर्गत वादातून अनेक परवानग्या रखडल्याने पुलाच्या कामात तब्बल पाच वर्षे विलंब झाला असल्याचे बोलले जाते. हा पूल बंद असल्याने अनेक मुंबईकर नागरिकांना मोठा फेरा मारून जावे लागत असल्याने मोठा फटका बसत होता.
(Hindustan Times)