मराठी सिनेमा इंडस्ट्रीचे कॉमेडी किंग दादा कोंडके यांचा सिनेमा म्हणजे कधीही पाहा आणि पोट धरून हसा. प्रेक्षकांना निखळ हसवत काही ना काही संदेश देण्याची दादा कोंडके यांची शैली अफलातून होती. म्हणूनच ३० वर्षांनंतरही दादांचा सिनेमा पाहताना तो ताजातवाना वाटतो. झी टॉकीज वाहिनीने दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना देण्यासाठी पुढाकार घेतल्याने दादांच्या चाहत्यांना हसरा रविवार साजरा करता येणार आहे.
येत्या रविवारी, १६ जून रोजी, दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता दादा कोंडके यांचा "अंधेरी रात में दिया तेरे हाथ में" हा सिनेमा झी टॉकीज वाहिनीवर हिंदी ऑडिओसह झळकणार आहे.
त्याचबरोबर, पुढील रविवारी, २३ जून रोजी, "आगे कि सोच" हा आणखी एक धमाल सिनेमा झी टॉकीजवर दाखवला जाणार आहे. हे हिंदी धमाल सिनेमे दादांच्या हिंदी प्रेक्षकांना ही ओढण्यात त्याकाळी यशस्वी होते.
येत्या रविवारी, दादा कोंडके यांचा अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी ट्रीट, "अंधेरी रात में दिया तेरे हाथ में" या सिनेमाचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. अर्थपूर्ण संवाद आणि निखळ विनोद यासाठी दादांचा हा सिनेमा गेल्या ३५ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालत आहे. १६ मे १९८६ रोजी "अंधेरी रात में दिया तेरे हाथ में" हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
"अंधेरी रात में दिया तेरे हाथ में" चित्रपटात दोन मित्र पैसेच्या लालसेपोटी अंडरवर्ल्डमध्ये सामील होतात आणि ऐशो-आरामाची जीवनशैली जगतात. कथा त्यावेळी वळण घेते जेव्हा त्यापैकी एकाला या गोष्टींचे दुष्परिणाम जाणवतात आणि तो साधं जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करतो.या सिनेमात दादा कोंडके यांच्यासोबत हिंदी अभिनेते अमजद खान, विजू खोटे, मेहमूद, दीना पाठक, भगवान दादा, उषा चव्हाण यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा त्या काळात प्रचंड गाजला होता. विनोदी संवादाने खूप धमाल उडवली होती.