
सामन्यात पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा ६-१ असा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. पण या महत्वाच्या सामन्यातील सर्वात चर्चित गोष्ट म्हणजे स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला बेंचवर बसवण्यात आले, म्हणजेच तो स्टार्टिंग-११ चा भाग नव्हता.
जेव्हा रोनाल्डोच्या स्टार्टिंग-११ मधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली, तेव्हा प्रत्येक चाहत्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर रोनाल्डोची बहीण एल्मा अवेरो हिनेही इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे.
एल्मा अवेरोने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटले आहे की, “ आज आपण सर्व एकत्र आहोत, जर तुम्हाला हे बरोबर वाटत असेल तर मी हे सर्व पाहण्यासाठी तयार आहे. तसेच, मला माहीत नाही की रोनाल्डोला बाहेर का बसवले गेले, मात्र, याबाबत लवकरच देवाकडून सर्वांना उत्तर मिळेल, अशी आशा आहे”.
विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी एल्मा अवेरो संपूर्ण कुटुंबासह स्टेडियममध्ये सतत पोहोचत आहे. पण पोर्तुगाल-स्वित्झर्लंड सामन्यात रोनाल्डोला खेळण्याची संधी न मिळाल्याने सर्वांचीच निराशा झाली. रोनाल्डो सामन्याच्या ७१व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात आला होता.
राऊंड ऑफ १६ फेरीत स्वित्झर्लंडविरूद्ध रोनाल्डो ऐवजी गोंकालो रामोसला खेळवण्यात आले. रामोसने या सामन्यात ३ गोल केले. सोबतच त्याने आपणही मॅचविनर असल्याचे सिद्ध केले आहे.
सामन्यानंतर पोर्तुगालचे मॅनेजर फर्नांडो सँटोस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रोनाल्डोला बाहेर ठेवण्याचा निर्णय हा गेम प्लॅन होता. हे आम्ही आधीच सांगितले होते. यात गोंधळात टाकणारे काही नाही. प्रत्येक खेळाडूची भूमिका वेगळी असते आणि त्या भूमिकेनुसार गोष्टी ठरवल्या जातात".




