टी-20 विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. टी-20 वर्ल्डकप २ जूनपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर टी-20 वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांवर एक नजर टाकूया.
१) ब्रेट ली- आपल्या वेगवान गोलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारा ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट ली हा T20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज आहे. ब्रेटलीने २००७ च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्ध सलग ३ चेंडूत ३ बळी घेतले होते. त्याने शकीब अल हसन, मश्रफी मोर्तझा आणि आलोक कपाली यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
कर्टिस कॅम्फर- आयरिश गोलंदाज कर्टिस कॅम्फरने T20 विश्वचषक २०२१ च्या पहिल्या फेरीत नेदरलँड्सविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. त्याने कॉलिन ॲकरमन, रायन टेन डोएश्चे आणि स्कॉट एडवर्ड्स यांना बाद केले होते. कर्टिस कॅम्फर टी-20 वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज आहे.
वानिंदू हसरंगा- श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा हा जगातील काही मोजक्या गोलंदाजांपैकी एक आहे, ज्यांनी एकदिवसीय आणि टी-20 मध्ये हॅटट्रिक घेतली आहे. २०२१ च्या टी-20 विश्वचषकात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅटट्रिक केली होती. हसरंगाने अनुक्रमे एडेन मार्कराम, टेंबा बावुमा आणि ड्वेन प्रिटोरियस यांना सलग ३ चेंडूत पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
कागिसो रबाडा- टी-20 विश्वचषक २०२१ मधील तिसरी हॅट्ट्रिक दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या नावावर होती. रबाडाने अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक घेत संघाला १० धावांनी विजय मिळवून दिला होता. इंग्लंडला शेवटच्या षटकात विजयासाठी १४ धावांची गरज होती. क्रिस वोक्स आणि इयॉन मॉर्गन क्रीजवर उपस्थित होते. पण रबाडाने पहिल्या चेंडूवर ख्रिस वोक्स, दुसऱ्या चेंडूवर कर्णधार मॉर्गन आणि तिसऱ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डन यांचा बळी घेत सामना फिरवला. तिन्ही गडी झेलबाद झाले.
कार्तिक मयप्पन- यूएईच्या कार्तिक मयप्पन यानेही रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. UAE चा हा फिरकीपटू २०२२ च्या T20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज होता. मयप्पनने १५ व्या षटकात लागोपाठ चेंडूंवर श्रीलंकेच्या भानुका राजपक्षे, चरित असलंका आणि कर्णधार दासून शनाका यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होता.