ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि स्टार फलंदाज डेविड वॉर्नरने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात डेविड वॉर्नरने ३६ धावांची खेळी केली.
यासह त्याने सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप-५ मध्ये एन्ट्री करत भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत काढला आहे. या यादीत वीरेंद्र सेहवाग पाचव्या स्थानावर होता.
इंग्लंड दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेट्ससाठी दोघांनी ६१ धावांची भागिदारी रचली. परंतु, डेव्हिड वॉर्नर ३६ धावांवर खेळत असताना ओली रॉबिन्सनने त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
मात्र, या ३६ धावांसह डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या टॉप-५ मध्ये जागा मिळवली. डेव्हिड वॉर्नरने सलामीवीर म्हणून ८ हजार २०८ धावा केल्या आहेत. तर, सहाव्या क्रमांकावर घसरण झालेल्या वीरेंद्र सेहवागने आपल्या कारकिर्दीत सलामीवीर म्हणून ८ हजार २०७ धावा केल्या आहेत.
(AFP)