पावसाळा आला की अनेकदा मुंबई ‘तुंबई’ होऊन जाते. नालेसफाई न झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचतं. त्याचा मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मुंबईतील तब्बल २२०० कीमी लांबीचे नाले आहेत. मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या या नाल्यांच्या सफाईच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी वांद्रे (पूर्व) येथील मिठी नदी आणि वाकोला नदी, दादर येथील प्रमोद महाजन उद्यानाजवळच्या साठवण टाकीचे बांधकाम, वरळी येथील लव्ह ग्रोव नाला आणि लव्हग्रोव उदंचन केंद्राची यावेळी पाहणी केली.
नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचते त्यांची माहिती अधिकाऱ्यांना असते त्यामुळे अशा जागी नोडल अधिकारी नेमून कंत्राटदाराकडून चांगल्या पद्धतीने काम करुन घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
समुद्रात भरती आल्यावर समुद्रातील पाणी नाल्यांमध्ये शिरू नये म्हणून वरळी येथील लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राच्या ठिकाणी नाल्यांना फ्लड गेट लावण्यात आले आहेत. अशाचप्रकारे फ्लड गेट आणि वेगाने पावसाचे पाणी समुद्रात फेकणाऱ्या पंपाची संख्या वाढवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. रेल्वेरुळांवर पाणी साचू नये यासाठी रेल्वे हद्दीतील नाल्यांची चांगली सफाई करण्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला सांगितले. यावेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, महापालिका आयुक्त आय. ए. चहल उपस्थित होते.