
रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज हीदेखील या मोठ्या सामन्यांपूर्वी कतारला पोहोचली आहे. जॉर्जिना काही दिवसांपूर्वी आपल्या मुलांसह कतारला पोहोचली होती. ती पोर्तुगालचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्येही गेली होती. यादरम्यान ती कतारमध्ये सध्या भटकंती करत आहे.
जॉर्जिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कतारमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने वाळवंटात फोटोशूट केले आहे. जॉर्जिनासोबतमुलंही आहेत, त्याशिवाय तिने फुटबॉल स्टेडियममधील काही फोटोही शेअर केले आहेत.
विशेष म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो या विश्वचषकात आतापर्यंत खास कामगिरी करू शकला नाही. खेळा व्यतिरिक्त इतर कारणांमुळेच तो जास्त चर्चेत राहिला आहे. स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोला स्टार्टिंग ११ मध्ये स्थान देण्यात आले नव्हते. यामुळे प्रचंड वादंगदेखील निर्माण झाला होता.
राऊंड ऑफ १६ फेरीतील सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोला संघातून वगण्यात आले. पोर्तूगाल संघाचे मॅनेजर फर्नांडो सँटोस यांनी सुरुवातीच्या प्लेईंग ११ मध्ये रोनाल्डोच्या जागी २१ वर्षीय गोन्सालो रामोसला खेळण्याची संधी दिली.
पोर्तूगालने त्या सामन्यात ६-१ असा विजय मिळवला. तर रोनाल्डो ७१व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात आला.
सामन्यानंतर पोर्तुगालचे मॅनेजर फर्नांडो सँटोस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रोनाल्डोला बाहेर ठेवण्याचा निर्णय हा गेम प्लॅन होता. हे आम्ही आधीच सांगितले होते. यात गोंधळात टाकणारे काही नाही. प्रत्येक खेळाडूची भूमिका वेगळी असते आणि त्या भूमिकेनुसार गोष्टी ठरवल्या जातात".
दरम्यान, पोर्तुगालने तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलध्ये धडक मारली आहे. यापूर्वी १९६६ आणि २००६ मध्ये पोर्तूगालचा संघ अंतिम आठमध्ये पोहोचला होता. आता शनिवारी (१० डिसेंबर) क्वार्टर फायनलमध्ये पोर्तुगालचा सामना मोरोक्कोशी होणार आहे. मोरोक्कोने राऊंड ऑफ १६ मध्ये स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० असा पराभव केला होता.





