छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती निमित्त ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शिवजयंती सोहळा पार पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी नटलेली आहे.
शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.
शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र 'शिवाई देवराई' विकसित करण्यात आली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे 'शिवाई देवराई' आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला.