छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या कार्यक्रमात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक प्रसिद्ध विनोदी कलाकार झळकले. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेता-लेखक योगेश शिरसाट. या कार्यक्रमातून योगेश शिरसाटने आपल्या विनोदी लेखनाचं आणि अभिनयाचं उत्तम प्रदर्शन केलं. ‘चला हवा येऊ द्या’च नव्हे, तर योगेश शिरसाटने ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’सारख्या कार्यक्रमांमध्येसुद्धा विनोदी स्कीट्स सादर केले होते.
अभिनय करण्याबरोबरच योगेश शिरसाट लेखनात देखील अव्वल आहे. कलेला रुपाची गरज नसते, असं म्हणतात ते मराठी मनोरंजन विश्वास अगदी खरं ठरलं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता लेखक योगेश शिरसाट. योगेश शिरसाट याने आपल्या दमदार लेखनानं आणि अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र, त्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आजघडीला योगेश शिरसाट हे नाव अगदी प्रत्येकासाठी ओळखीचं आहे. मात्र, एक वेळ अशी होती, जेव्हा हे नाव मिळवण्यासाठी योगेशला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती.
नुकतीच योगेश शिरसाट याने एका प्रसिद्ध वेबसाईटला मुलाखत दिली. यात त्याने आपल्या संघर्षाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या मुलाखतीत योगेशला दिसण्यावरून कधी कुठली भूमिका नाकारली गेली आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना योगेश म्हणाला की, ‘मला माझ्या दिसण्याने कधी फार फरक पडला नाही आणि दिसण्यामुळे कधी एखादी भूमिका ही हातून गेली नाही. पण, सोशल मीडियावर कमी फॉलोअर्स असल्यामुळे मोठा फटका मात्र नक्की बसला आहे.’
कमी फॉलोअर्स असल्यामुळे योगेशला एका जाहिरातीतून काढून टाकण्यात आलं होतं, याचा खुलासा स्वतः योगेशने या मुलाखतीत केला आहे. त्याबद्दल योग्य बोलताना योगेश म्हणाला की, ‘मला माझ्या दिसण्यावरून किंवा शरीर यष्टीवरून कामांमध्ये कधीच अडचण आली नाही. उलट आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत दिसण्यापेक्षा गुणांना आणि कलेला अधिक महत्त्व दिले जाते. पण, सोशल मीडिया फॉलोअर्स आजकाल काम मिळवण्यात अगदी महत्त्वाचे फॅक्टर ठरत आहेत.’
‘एकदा एका जाहिरातीसाठी माझी निवड झाली होती. त्या जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी मी पूर्ण स्वतःला तयार देखील केलं होतं. इतकंच नाही तर, शूटिंगला जाण्यासाठी विमानाची तिकीटही माझ्याकडे आली होती. तर, जाहिरातीचे चित्रीकरण जयपूरला होणार होतं. सगळं काही ठरलं होतं. मात्र, चित्रीकरणाच्या अवघ्या दोन दिवस आधी मला त्या जाहिरातीतून काढून टाकल्याचा फोन आला. या मागचं कारण होतं इंस्टाग्रामचे फॉलोअर्स.. जाहिरातीच्या टीमने माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स पाहिले आणि कमी फॉलोअर्स असल्याचं कारण देऊन, मला तडकाफडकी जाहिरातीमधून काढून टाकलं होतं’, असं योगेश म्हणाला.