रशिया हा जगातील सर्वात सुंदर देश आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करत असतात. २०२३ च्या मध्यापासून भारतीय पर्यटकांना रशियाला जाण्यासाठी ई-व्हिसा घ्यावा लागतो. या द्वारे भारतीय पर्यटकांना ४ दिवसांत रशियात थांबण्याची परवानगी मिळते. मात्र, या पुढे रशियाला जाणे आणखी सोपे होणार आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय पर्यटकांना रशियाला जाण्यासाठी आता टुरिस्ट व्हिसाची गरज भासणार नाही. पर्यटनावर केंद्रित असलेल्या दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी २०२५ मध्ये असे व्हीसा फ्री धोरण राबवले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय पासपोर्टवर व्हिसा फ्री प्रवेश मिळणाऱ्या यादीत ६३ व्या क्रमांकावर रशिया राहील.
जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर तुम्ही व्हिसाशिवाय ६२ देशांमध्ये प्रवास करू शकता. आता त्या यादीत रशियाची भर पडणार आहे. २०२५ च्या वसंत ऋतूच्या सुरुवातीला या खुशखबरीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहे. यावर्षी जूनमध्ये नवी दिल्ली आणि मॉस्कोमध्ये पर्यटन व्हिसा नियमांवर चर्चा झाली होती. यात भारतीय पर्यटकांना रशियात व्हिसाशिवाय प्रवास दिला जाणार यावर चर्चा झाली होती.
रशिया आणि भारत पर्यटन क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी 'व्हिसा फ्री ग्रुप टुरिस्ट एक्स्चेंज'साठी पुढाकार घेत आहेत. मॉस्कोने म्हटले आहे की, "दोन्ही देशांमध्ये चर्चेची पहिली फेरी या वर्षी जूनमध्ये झाली होती. या वर्षाच्या अखेरीस द्विपक्षीय करार होण्याची शक्यता आहे. रशियाने २०२३ मध्ये भारतीय पर्यटकांना ९५०० ई-व्हिसा जारी केले होते. जे रशियाने जारी केलेल्या एकूण ई-व्हिसाच्या ६ टक्के होते. .
अलीकडच्या काळात रशियात जाण्याचा भारतीय पर्यटकांचा कल वाढला आहे, मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटक रशियाला जात आहे. भारतीय पर्यटकांत वाढ झाल्याचे रशियाने देखील सांगितले आहे. रशिया ज्या देशांना ई-व्हिसा देतो त्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे. बहुतांश भारतीय रशियात व्यवसाय किंवा कामानिमित्त जातात, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. रशियाचे म्हणणे आहे की मॉस्कोचे प्रशासन भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहते.